Wednesday, February 18, 2026

शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच – माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न; वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. शेती विकासासाठी अजूनही अधिक खोलवर जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. शेतीच्या विविध कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर असून, त्यांच्या श्रमांमध्ये बचत होईल असे संशोधन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच झाली आहे. कृषि विभागामार्फत सध्या ५० हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाउंडेशन व इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी” या उपक्रमांतर्गत फुले कृषि महोत्सव–२०२६ (थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषि प्रदर्शन) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषि परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषि परिषदेच्या महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भाप्रसे), कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले व डॉ. शिल्पा पाटील, पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब जठार व बाळासाहेब आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले की, विद्यापीठाची पुढील वाटचाल शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून केली जाणार आहे. हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरावर विद्यापीठाचा विशेष भर राहील. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची दालने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. फुले कृषि महोत्सवामध्ये आयोजित विविध पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या विविध तंत्रज्ञान व उत्पादने दर्शविणारे स्टॉल्स तसेच महाबीज व कृषि विभागाच्या स्टॉल्सना मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रदर्शनादरम्यान माननीय कृषिमंत्री तसेच कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), प्राध्यापक, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच १२ हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

सौजन्य – डॉ. सचिन सदाफळ, जनसंपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी