Wednesday, February 18, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची एमजीएम कृषी विज्ञान केंद्रातील नव्या पशु आहार प्रकल्पास भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी महात्मा गांधी मिशन संचलित कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशु आहार प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एमजीएम कृषि विज्ञान केंद्रातील पशुखाद्य निर्मिती युनिटला भेट दिली.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी प्रकल्पातील विविध कार्यपद्धती, पशुखाद्य निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, कच्च्या मालाचे व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे मार्गदर्शन यांची सविस्तर पाहणी केली. युनिटमध्ये तयार होणारे संतुलित पशुखाद्य दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी आणि जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. कमी खर्चात दर्जेदार खाद्य उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि पशुपालन व्यवसाय अधिक नफ्यात आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. के. ए. धापके (संचालक, एमजीएम हिल्स, गांधेली), डॉ. नरेंद्रसिंग चव्हाण (प्राचार्य—एमजीएम कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय), श्री. काकासाहेब सुकासे (प्रभारी—वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), डॉ. श्रीकांत खुपसे (विषयतज्ज्ञ—पशु व्यवस्थापन) यांच्यासह कृषि विज्ञान केंद्रातील इतर विषयतज्ज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी युनिटच्या कार्यपद्धतींबाबत सविस्तर माहिती सादर केली.

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन माननीय कुलगुरू व संचालकांनी दिले, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.