Friday, February 20, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व रोजगार संधींवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान “व्यक्तिमत्त्व विकास व रोजगार संधींवर (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि जॉब ऑपर्च्युनिटीज)” या विषयावर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भाकृअप एससी-एसपी (ICAR SC-SP) अनुदानांतर्गत, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या व शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

प्रशिक्षणाचा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामेटेके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तर उद्घाटन शिवाजी कॉलेज, परभणीचे रजिस्ट्रार श्री. विजय मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचे विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रभारी प्राचार्य प्रा. विवेकानंद भोसले, प्रशिक्षण समन्वयक डॉ. मधुकर मोरे व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दत्तात्रय पाटील उपस्थित होते.

तीन दिवसांच्या प्रशिक्षणात व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्ये, SWOT विश्लेषण, ग्रुप डायनॅमिक्स व टीम बिल्डिंग, शिस्त व आचरण, करिअरच्या संधी, कॅम्पस इंटरव्ह्यूची तयारी, उच्च शिक्षण व प्लेसमेंट आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. विशाला पटणम, डॉ. पंडित निर्मळ, डॉ. प्रविण कापसे, श्री. शेखर अष्टिकर, डॉ. मधुकर मोरे, श्री. रामेश्वर चिलवंत (पुणे), डॉ. सुभाष विखे, प्रा. विवेकानंद भोसले, कन्सल्टंट डॉ. उपेंद्र सोनटक्के (मुंबई), प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. गोपाळ शिंदे व डॉ. प्रमोदिनी मोरे यांनी व्याख्याने दिली.

कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा होता. समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेऊन त्यांच्या अनुभवांचे विश्लेषण करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम सहभागींसाठी अत्यंत उपयुक्त ठरला, असे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

समारोप समारंभात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.