Wednesday, February 18, 2026

वनामकृवित शिवजन्मोत्सव २०२६ निमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पाच्या निमित्ताने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुभेच्छा दिल्या.

शिवचरित्रातील संघर्षातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी – व्याख्याते श्री. गणेश शिंदे यांचे चौथ्या पुष्पात  प्रतिपादन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२६ निमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या चौथ्या व अंतिम पुष्पाचा समारोप दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना संबोधित करून कार्यक्रमाचा समारोप केला व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प प्रसिद्ध व्याख्याते व इतिहास अभ्यासक श्री. गणेश शिंदे (अहिल्यानगर) यांनी गुंफले. शिवचरित्रातील संघर्षातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी या विषयावर त्यांनी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य हे होते. व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. हरिहर कौसडीकर, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शिक्षण प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी संग्राम चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज तसेच वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना व कृषि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य यांनी उपस्थितांना शपथ दिली. तसेच त्यांनी भाषणात संकटाच्या काळात शिवचरित्रातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखावी व ठाम ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात डॉ. रणजित चव्हाण यांनी शिवजयंती साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. आपल्या व्याख्यानात श्री. गणेश शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील आग्रा सुटका, पुरंदरचा तह यांसारख्या प्रसंगांचे संदर्भ देत संघर्ष, धैर्य, दूरदृष्टी व नेतृत्वगुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, असे सांगितले. शिवरायांचा शेती व शेतकरीविषयक दृष्टिकोन विशद करत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख विचारांची जोपासना करण्याचे आवाहन केले.

सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वामन काळबांडे यांनी केले, तर आभार वेदांत दापके यांनी मानले. या कार्यक्रमास शिवप्रेमी विद्यार्थी-विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.