Thursday, February 19, 2026

वनामकृविद्वारा मानवत येथे ‘करडई शेती दिन’ उत्साहात संपन्न

करडई मधील ३४ टक्के तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प व हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करडई पिकावरील प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘करडई शेती दिन’ मानवत येथे उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम मानवत येथील आंबेगाव रोडवरील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री यांच्या शेतावर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. डी. प्रसाद, कृषि विद्यावेत्ता डॉ. संजीव मलय्या तसेच शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा एन. डी. उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “शेतकरी देवो भव” हा संदेश देत संशोधनाधिष्ठित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सध्या करडई पिकामध्ये ३४ टक्के तेलाचे प्रमाण असलेले वाण उपलब्ध असून, भविष्यात ते ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचे शेतकरी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे व सक्षम शास्त्रज्ञांमुळे जागतिक स्तरावर अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सन्मान हाच शेतीचा सन्मान असून, शेतकऱ्यांना भेटल्यावर देव आपोआप भेटतो, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले. याप्रसंगी माननीय कुलगुरूंच्या हस्ते उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी संशोधनाधिष्ठित शेतीचे महत्त्व, विस्तार सेवांची भूमिका तसेच शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. आर. डी. प्रसाद यांनी करडई पिकावरील रोगांची ओळख व त्यांचे निदान याविषयी माहिती दिली, तर डॉ. संजीव मलय्या यांनी करडई पिकासाठी आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत व संतुलित खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश धुतमल यांनी केले. यावेळी तज्ज्ञांनी करडई पिकातील सुधारित वाण, आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत, संतुलित खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल शिलेवंत व डॉ. संतोष शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानवत येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री व श्री. प्रतापराव सोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, परभणी येथील डॉ. घुगे, श्री. पांचाळ, श्री. मगर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तांत्रिक माहितीचा लाभ घेतला.