Wednesday, February 18, 2026

एआय-आधारित कृषि सल्ला सेवा : वनामकृविद्वारा शेतकरी संवाद व महिलांसाठी सहभागात्मक कार्यक्रम राबविला

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV) अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषि हवामानशास्त्र प्रकल्प (AICRPAM) यांच्या वतीने पालम तालुक्यातील रावराजूर येथे “एआय-आधारित कृषि सल्ला सेवा” या उपक्रमांतर्गत दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकरी गटचर्चा (FGD) आयोजित करण्यात आली. हा उपक्रम मान्सून मिशन –III Monsoon Mission–III (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) यांच्या सहयोगातून आणि माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून इक्रीसॅट, क्रीडा (हैदराबाद) आणि इल्री ( ICRISAT, ICAR-CRIDA and ILRI) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित आहे.

गटचर्चेदरम्यान हवामानातील बदल, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा अत्यंत हवामान घटनांचा शेती निर्णय प्रक्रियेवर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले.

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्त “महिला समावेशक डिजिटल कृषि सल्ला सेवा” या विषयावर आयोजित करण्यात आला. महिलांच्या माहिती गरजा, डिजिटल सल्ला सेवांपर्यंत समान प्रवेश तसेच हवामान-स्मार्ट शेती निर्णय प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग यावर विशेष भर देण्यात आला.

या संवादातून पिकनिहाय, अवस्थेनिहाय व स्थानिक परिस्थितीनुसार एआय-आधारित कृषि सल्ला विकसित करण्यासाठी आवश्यक सूक्ष्म पातळीवरील माहिती संकलित करण्यात आली. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकरी घेत असलेले निर्णय, तसेच कृषि हवामान सल्ला सेवांचा वापर करताना येणाऱ्या अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

कार्यक्रमास डॉ. कैलास के. डाखोरे (AICRPAM, VNMKV, परभणी), डॉ. ए. व्ही. एम. सुब्बाराव (ICAR-CRIDA, हैदराबाद) व डॉ. किशोर कुमार (ICRISAT, हैदराबाद) उपस्थित होते. गावचे सरपंच तसेच श्री. हेमचंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले.

एआय तंत्रज्ञानाचा कृषि सल्ला सेवांमध्ये प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांपर्यंत अचूक, वेळेवर व स्थानिक गरजांनुसार सल्ला पोहोचण्यास मदत होऊन शेतीतील जोखीम कमी होण्यास आणि निर्णयक्षमतेत वाढ होण्यास हातभार लागणार आहे.