Thursday, February 19, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) SC-SP अनुदानांतर्गत व्यक्तिमत्त्व विकास व रोजगार संधींसाठी सॉफ्ट स्किल्स” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान यशस्वीरीत्या संपन्न झाला असून समारोप मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी शुभेच्छा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून रोजगारक्षम युवक घडविण्यास यामुळे निश्चितच मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सामुदायिक विस्तार व संपर्क व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली.

तीन दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास वाढ, नेतृत्वगुण विकास, निर्णयक्षमता, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर तसेच रोजगाराच्या विविध संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ वीणा भालेराव आणि अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. उद्घाटन सत्रानंतर पहिल्या दिवशी व्यक्तिमत्त्व व संवाद कौशल्य वृद्धी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. विशाला पटनम यांनी करिअर विकासासाठी प्रभावी संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच प्रा. डॉ. पंडित निर्मल यांनी व्यक्तिमत्त्व विकासात भाषेची भूमिका उलगडून सांगितली. दुपारच्या सत्रात व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक श्री. शेखर आष्टिकर व शिवाजी महाविद्यालयाचे कुलसचिव विजय मोरे यांनी सॉफ्ट स्किल्स वृद्धीबाबत मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी पुण्याचे सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक श्री रामेश्वर चिलवंत यांनी अवचेतन मनाची शक्ती व न्यूरोप्लॅस्टिसिटी या विषयावर सखोल कार्यशाळा घेतली. यानंतर माननीय कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कपसे यांनी व्यक्तिमत्त्वाचे SWOT विश्लेषण व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. वीणा भालेराव यांनी समुदायाशी नातेसंबंध वृद्धीवर व्याख्यान दिले.

तिसऱ्या दिवशी डॉ. शिवा ऐथाळ यांनी स्पष्ट विचारसरणी व निर्णयक्षमतेसाठी आवश्यक कौशल्यांवर प्रकाश टाकला. त्यानंतर डॉ. नीता गायकवाड यांनी सॉफ्ट स्किल्स व रोजगार संधी यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाबाबत अभिप्राय नोंदविला. समारोप सत्रात विकास क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. उपेंद्र सोनटक्के यांनी व्यावसायिक व वैयक्तिक यशासाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाल्याचे आयोजकांनी नमूद केले. या कार्यक्रमातून प्रभावी संवाद, निर्णयक्षमता तसेच रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास होऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी अधिक सक्षम करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.