Tuesday, February 17, 2026

कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील शेतीविषयक ज्ञान आत्मसात करावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२६ निमित्त दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. या समारोपप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना संबोधित करताना, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील शेतीविषयक ज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये व लोककल्याणकारी धोरणे आत्मसात करावीत असे आवाहन केले. त्यांनी सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप केला.

या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प प्रसिद्ध व्याख्याते व इतिहासतज्ज्ञ डॉ. प्रशांत कोठे, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, तसेच डॉ. संतोष फुलारी व डॉ. धीरज पाथ्रीकर उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी संग्राम चोपडे व रणजित वडकुते यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. शिवजयंती साजरी करण्यामागील उद्देश, शिवचरित्रातील आदर्श मूल्ये व विद्यार्थ्यांसाठी त्यांचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अनुराधा लाड यांनी करून दिला.

आपल्या व्याख्यानात डॉ. प्रशांत कोठे यांनी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक संकल्पना, महसूल व्यवस्था, पाणी व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे संरक्षण आणि प्रशासनातील शिस्त यावर सखोल व मुद्देसूद भाष्य केले. शिवकालीन शेती व्यवस्थापनातून आजच्या कृषि शिक्षणाला दिशा मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानामुळे शेती शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवचैतन्य व प्रोत्साहन मिळाले.

याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वर खटिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले. या कार्यक्रमास शिवप्रेमी विद्यार्थी-विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.