वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषि
विकास योजनेच्या सहाय्याने दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली तरोडा (ता. व जि. परभणी) येथे शेतकरी
प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरात
परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांना
उत्पादन खर्च कमी करून ऊसाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बेने प्रक्रिया, जैविक खते व सेंद्रिय निविष्ठांचा वापर याविषयी
मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सविस्तर
मार्गदर्शन केले. तसेच जमिनीचे आरोग्य व पीक पोषणाशी संबंधित शेतकऱ्यांना
भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरणही करण्यात आले.
मृद विज्ञान
विभागातील दीर्घकालीन खत प्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी
राष्ट्रीय कृषि विकास योजना व प्रशिक्षण शिबिराची प्रस्तावना मांडत रासायनिक
खतांच्या वापराचा जमिनीवरील परिणाम आणि पिकांची उत्पादकता याबाबत माहिती दिली.
रासायनिक खतांचा संतुलित व कमी वापर,
माती परीक्षणाचे महत्त्व आणि जैविक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य
कसे सुधारता येईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत
डॉ. कौसडीकर यांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षण
शिबिरात केवळ जैविक खतांचे महत्त्व विशद करण्यात आले नाही, तर विद्यापीठाद्वारे उत्पादित जैविक खत
(एनपीके कन्सोरशियम), सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त व विद्राव्य
खते प्रतिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. त्याचबरोबर या जैविक
खतांचा योग्य वापर, पद्धत व प्रमाण याबाबत सविस्तर
मार्गदर्शन व प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
तरोडा
परिसरातील उपस्थित सर्व शेतकऱ्यांना विद्यापीठातील सेवा व उपलब्ध निविष्ठांची
माहिती देत कृषि विद्यापीठाशी अधिकाधिक संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात आले. हे
प्रशिक्षण शिबिर श्री. उद्धव शेळके यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते.
शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सध्याच्या रब्बी हंगामातील पिकांतील पोषणविषयक
समस्यांचे निराकरण करून घेतले.
