वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने तसेच शेकरू फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी पीजीएस (Participatory
Guarantee System) प्रमाणिकरण पद्धत या विषयावर दिनांक १० फेब्रुवारी
२०२६ रोजी आयोजित ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी मराठवाडा विभागात नैसर्गिक शेतीचे सविस्तर मॅपिंग व वैज्ञानिक दस्तऐवजीकरण
करण्याची गरज अधोरेखित केली.
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले
की, मराठवाड्यात किती शेतकरी नैसर्गिक शेतीचे संपूर्ण प्रोटोकॉल अवलंबत आहेत व
किती शेतकरी त्यातील एक किंवा अधिक घटकांचा वापर करीत आहेत, याची
शास्त्रीय नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीमध्ये तण व्यवस्थापन (weed
dynamics), पाण्याची गरज, ऊर्जा व मजूर गरज,
लागवड खर्च आदी घटकांचा योग्य डेटा संकलन करून त्यावर आधारित वैज्ञानिक
सादरीकरण विकसित करावे, असे त्यांनी नमूद केले. नैसर्गिक शेतीमध्ये
प्रमाणिकरणाला अनन्यसाधारण महत्त्व असून योग्य प्रमाणिकरणामुळे बाजारात चांगला दर मिळण्यास
मदत होते व उत्पादनाचा विश्वासार्ह ब्रँड तयार होतो, असे त्यांनी
स्पष्ट केले. उत्पादन प्रणालीचे प्रमाणिकरण करावे की थेट उत्पादनाचे, याबाबतही सखोल मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच नैसर्गिक शेतीमुळे मातीच्या भौतिक, रासायनिक
व जैविक गुणधर्मांमध्ये होणारे बदल, मातीची सुपीकता, पाणी व मृदा संवर्धन, मानवी आरोग्यावर होणारे सकारात्मक
परिणाम, उत्पादन खर्चात होणारी बचत तसेच शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष
अनुभव यांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ उत्पादन (yield)
या एका निकषावर न थांबता मातीचे आरोग्य व पर्यावरणीय लाभ यांचा व्यापक
विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. पिकांची योग्य निवड व शेतकऱ्यांचा अनुभव हा नैसर्गिक
शेतीच्या यशाचा महत्त्वाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रम संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांच्या
मार्गदर्शनात पार पडला. विद्यापीठाच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन
प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी प्रास्ताविक केले.
प्रमुख मार्गदर्शक मुंबई येथील या
विषयावर सर्टिफिकेशन सर्विसेसचे संचालक डॉ. अतुल पाटील यांनी नैसर्गिक शेतीमध्ये प्रमाणिकरणाचे
महत्त्व,
गरज व भविष्यातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पीजीएस
प्रमाणिकरण प्रक्रिया, गट प्रमाणिकरण, प्रमाणिकरणाचा
खर्च, तपासणी पद्धती, आवश्यक नोंदी (रेकॉर्ड्स)
तसेच विपणन व निर्यातीतील संधी याबाबत सखोल माहिती दिली.
सूत्रसंचालन आणि आभार डॉ. धीरज पाथ्रीकर
यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा मार्गदर्शन कार्यक्रम
नैसर्गिक शेतीच्या शास्त्रीय अभ्यासाला चालना देणारा ठरला असून मराठवाड्यात नैसर्गिक
शेतीच्या विस्तारासाठी व शाश्वत शेती व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण दिशादर्शक ठरेल, असा
विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

.jpeg)
