वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या फळबाग संशोधन केंद्रात शेतकरी, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण संपन्न
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील फळबाग संशोधन केंद्र
(हिमायत बाग) येथे पीक विविधता पथदर्शी प्रकल्प तसेच एकात्मिक फलोत्पादन व
रोपवाटिका विकास कार्यक्रम याअंतर्गत शेतकरी,
अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी
संयुक्तपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते.
अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत एकात्मिक शेती पद्धती योजनेद्वारे राबविण्यात
आलेल्या पीक विविधता पथदर्शी प्रकल्पाच्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पीक विविधतेचे
महत्त्व अधोरेखित करताना, केवळ एकाच पिकावर
अवलंबून राहिल्यास हवामान बदलामुळे होणारे नुकसान अधिक तीव्र स्वरूपाचे होते,
असे स्पष्ट केले. कापूस किंवा सोयाबीनसारख्या सलग लागवड होणाऱ्या
पिकांऐवजी पर्यायी पिकांचा विचार करून पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे
त्यांनी नमूद केले. पीक पद्धतीत संपूर्ण बदल न करता लहान-लहान सुधारणा करून
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवणे तसेच
पर्यावरणपूरक शेती करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या
शेतावरच संशोधन प्रयोग राबविणे ही काळाची गरज असून भविष्यातील संशोधन त्या
दृष्टीने व्हावे, असे त्यांनी सूचित केले.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात सध्या कापूस, मका व सोयाबीन ही प्रमुख पिके असून पूर्वी मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी
भुईमूग, बाजरी, रब्बी ज्वारी, मूग, उडीद आदी पिकांचे क्षेत्र लक्षणीयरीत्या
घटल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्री. प्रकाश देशमुख यांनी दिली. या
प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी उपयुक्त पीक पद्धती सुचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी रब्बी ज्वारी व करडईसारख्या पिकांचा
पीक पद्धतीत समावेश करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी
श्री. प्रकाश पाटील यांनी शेतकऱ्यांना सहज स्वीकारता येतील अशा शेती पद्धती विकसित
करण्यावर भर दिला. डॉ. एस. बी. पवार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विविध
आंतरपीक व पीक पद्धतींचा आढावा सादर केला,
तर डॉ. संजय पाटील यांनी एकात्मिक फलोत्पादन विकासाबाबत शेतकऱ्यांना
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक प्रा. किरण जाधव, मुख्य कृषी विद्यावेत्ता (एकात्मिक शेती पद्धती योजना) यांनी केले. आभार
प्रदर्शन डॉ. रवी नायनवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ.
सुदाम शिराळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी अधिकारी व संशोधक उपस्थित होते.
.jpeg)

