Wednesday, February 4, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास २०२५ चा ऊर्जा संवर्धन पुरस्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जेच्या प्रभावी वापरातून ऊर्जा संवर्धनात विद्यापीठाची भरीव कामगिरी

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत महाराष्ट्र ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२५” (Energy Conservation Award 2025) अंतर्गत विद्यापीठ गटात (University Category) द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. हे पुरस्कार महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA) यांच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या पुरस्कारांच्या माध्यमातून उद्योग, संस्था, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था (NGOs) तसेच इमारती यांच्याकडून राबविण्यात आलेल्या उल्लेखनीय ऊर्जा कार्यक्षमता व ऊर्जा संवर्धनाच्या उपक्रमांना गौरविण्यात येते. या पुरस्कारांचा उद्देश राज्यभर ऊर्जा कार्यक्षमतेचा प्रसार करणे तसेच शाश्वत व पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची उभारणी रीन्युएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी मोड (RESCO Mode) अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तसेच मुख्यालयातील विविध महाविद्यालयांच्या इमारतींच्या छतांवर ५०० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू म्हणाले होते की, हा प्रकल्प विद्यापीठासाठी पथदर्शी ठरणार असून सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करेल. भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौर ऊर्जा निर्मितीस मोठा वाव असून अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात अधिक व्यापक कार्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून त्यामुळे लक्षणीय आर्थिक लाभ होईल. परभणी येथील मुख्यालय तसेच बाहेरील कार्यालयांचा विद्युत बिलाचा खर्च शून्यावर आणण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने उभारण्यात येणार आहेत. तसेचविजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती” या संकल्पनेवर भर देत, सर्वांनी आवश्यकतेनुसारच विजेचा वापर करावा, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी त्यावेळी केले होते.

त्यानुसार विद्यापीठात ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, वीज बचत, नवीकरणीय ऊर्जेचा प्रभावी वापर तसेच ऊर्जा व्यवस्थापनासंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यापीठास हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने ऊर्जा संवर्धनाबाबत अवलंबिलेल्या सातत्यपूर्ण धोरणे व प्रभावी अंमलबजावणीची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातही ऊर्जा संवर्धन व शाश्वत विकासासाठी विद्यापीठ कटिबद्ध राहील, असे त्यांनी नमूद केले.

या सर्व प्रकल्पांसाठी अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख तथा कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी विशेष परिश्रम घेऊन प्रभावी देखरेख केली. त्यांनी पुणे येथे विद्यापीठाने अवलंबलेले तंत्रज्ञान आणि उपाय यांचे सादरीकरण नुकतेच केले होते. त्यांचे मुल्यांकन करून हा पुरस्कार देण्यात आला असे डॉ. रामटेके यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची शैक्षणिक व सामाजिक जबाबदारीची प्रतिमा अधिक उजळली असून, इतर शैक्षणिक संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प