Monday, February 9, 2026

अहंकार त्याग, ‘डिसएंगेज’ची कला आणि वर्तमानात जगण्याचा मंत्रच यशाचा मार्ग – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात “हॅपिनेस को कहो हाय… टेन्शन को कहो बाय” प्रेरणादायी व्याख्यान

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 
मोटिवेशनल स्पीकर डॉ. बी. के. शक्तिराज भाई 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालनालय व ब्रह्मकुमारी, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठातील सिम्पोसियम सभागृह (हॉल क्र. १५), प्रशासकीय भवन येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ते, लाईफ कोच व मोटिवेशनल स्पीकर डॉ. बी. के. शक्तिराज भाई यांनी व्याख्यान दिले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, अर्चना बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जर सर्वांनी अहंकार सोडला तर निश्चितच यशस्वी होता येईल. विनाकारण तणाव घेऊन त्याचे ओझे वाहू नये, यासाठी सोडून देण्याची  (‘डिसएंगेज’ करण्याची) कला आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कृतीगीत व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे त्यांनी कौतुक केले. लहान मुलांसारखी निरागस वृत्ती ठेवून साधे व आनंदी जीवन जगण्याची कला शिकावी, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की घर, कार्यालय किंवा इतर ठिकाणी शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसतानाही त्या ठिकाणचे विचार मनात असतील, तर मनाची द्विधा अवस्था निर्माण होते आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे समोर असलेली व्यक्ती, वेळ आणि कार्य यांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. भविष्याची चिंता करत वर्तमान खराब करू नये, तर वर्तमानात जगण्याची कला आत्मसात करावी, यासाठी चांगल्या आठवणींचे स्मरण करावे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबाबत अधिक विचार करू नये, तर नियंत्रणाऐवजी योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा, असे सांगताना त्यांनी म्हटले की डोक्यावरचे ओझे माणसाला थकवत नाही, तर डोक्यातील ओझे माणसाला थकवते. आपण इतरांसाठी चांगले केल्यावर त्यांच्याकडून तशीच अपेक्षा ठेवू नये, दुर्लक्ष करण्याची क्षमता वाढवावी, आनंदाचे क्षण जपावेत आणि सामर्थ्यवान व्यक्तीनेही क्षमा करण्याची कला आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. बी. के. शक्तिराज भाई यांनी हॅपिनेस को कहो हाय… टेन्शन को कहो बाय” या प्रभावी विषयावर मार्गदर्शन केले. सकारात्मक विचारसरणी, आनंदी जीवनशैली, तणावमुक्त जीवन जगण्याचे महत्त्व तसेच आत्मविकासासाठी मानसिक सशक्ततेची आवश्यकता यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या व प्रभावी शैलीतील भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. शक्तिराज भाई यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या बुद्धीला चार्ज करणे आवश्यक आहे. मानवी जीवनात केवळ बुद्ध्यांक (IQ) नव्हे, तर भावनिक क्षमता निर्देशांक (Emotional Quotient – EQ) अधिक महत्त्वाचा असून, वर्तमान परिस्थितीत येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी भावनिक संतुलन आवश्यक असते. सैन्यदल, क्रीडा, कार्यालयीन जीवन अशा सर्व क्षेत्रांत यशस्वी संतुलनासाठी भावनिक समतोल राखणे गरजेचे आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी दैनंदिन ध्यान (मेडिटेशन) हा एक प्रभावी पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाने स्वतःमधील शक्ती ओळखून आपल्या भावनिक क्षमतांचा विकास करावा, असे सांगत त्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे अहंकार व गर्व दूर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. हसू, राग आणि तणाव यामुळे शरीरात होणारे शारीरिक बदल व त्यातून निर्माण होणाऱ्या हार्मोन्सचे परिणाम त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विशद केले. आनंदी जीवनासाठी कोणताही औषधी खुराक नसून, आनंद ही एक जीवनशैली आहे, असे त्यांनी सांगितले. आज आपण आनंदी असू, तर भविष्यातही आनंदी राहण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे वर्तमान क्षणाचे महत्त्व ओळखावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.