Wednesday, February 18, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री. दादासाहेब शिंदे यांच्या प्रक्षेत्रास भेट; आयएआरआय नवोन्मुख शेतकरी पुरस्काराबद्दल अभिनंदन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिंदोन येथील शेतकरी मा. श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांच्या प्रक्षेत्रास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

श्री. शिंदे यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२६ साठी जाहीर झालेल्या मानाच्या आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या संपूर्ण प्रक्षेत्राची पाहणी केली. प्रक्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या गुलाब शेतीसह जीप्सोलीना व स्नॅपड्रॅगन या नाविन्यपूर्ण फुलपिकांच्या शेतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी माननीय कुलगुरू म्हणाले की, हा पुरस्कार अत्यंत मानाचा असून तो मिळणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या प्रसाराची जबाबदारी आणखी वाढते. आज शेतकरी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसत आहे. अशा प्रगतशील शेतकऱ्यांचे कार्य इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी बांधवांशी माननीय कुलगुरूंनी संवाद साधला.

या भेटीप्रसंगी माननीय कुलगुरूंयांच्यासह महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषद, पुणे येथील माजी महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, एमजीएम परिसराचे संचालक श्री. धापके, कृषि विज्ञान केंद्रच्या प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे व डॉ. संजुला भावर यांची उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू व विस्तार शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांचा पुरस्कारासाठीचा अर्ज भारतीय कृषि संशोधन केंद्र, नवी दिल्ली येथे सादर करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून एका शेतकऱ्याची निवड करण्यात येते. त्यानुसार, महाराष्ट्रातून यावर्षीच्या पुरस्कारासाठी  श्री. दादासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील संपर्क शेतकरी असून त्यांनी फुलशेती, फळबाग लागवड, जैविक निविष्ठा निर्मिती, शेतीतील यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर, सुधारित व शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब, जिल्ह्यात नाविन्यपूर्ण फुलपिकांची लागवड, पॉलिहाऊसमधील फुलशेती, मृदा व जलसंधारणाचे उत्कृष्ट नियोजन यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.

यासोबतच त्यांनी विद्यार्थी व समाजातील विविध घटकांना वेळोवेळी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी केव्हीके तसेच जिल्ह्यातील विविध विभागांसोबत नियमितपणे कार्य करून इतर शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.

या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी त्यांना २०२६ चा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पुसा, नवी दिल्ली येथे आयोजित पुसा कृषि विज्ञान मेला दरम्यान देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.