Tuesday, February 3, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते डॉ. मदन पेंडके यांचा यथोचित सत्कार

 ३३ वर्षांच्या विद्यापीठ सेवेनंतर डॉ. मदन पेंडके यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. मदन पेंडके हे दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या सेवाकार्यपूर्ती व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण  वैद्य, डॉ. शिवाजीराव शिंदे, डॉ. विश्वनाथ खंदारे, मृदा व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरीहर कौसडीकर, उपसंचालक संशोधन डॉ. गजेंद्र जगताप, तसेच डॉ. मदन पेंडके कुटुंबीय श्रीमती मंजिरी पेंडके व कु. ईशा पेंडके उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते डॉ. मदन पेंडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरूंनी डॉ. पेंडके यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील जिद्द, चिकाटी, प्रामाणिक परिश्रमशीलता व सदैव सकारात्मक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक प्रतिमेला भरीव योगदान लाभले असून विद्यापीठाची ओळख अधिक उजळण्यास मोलाची मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. पेंडके यांनी आपल्या कर्तृत्वातून सहकाऱ्यांसह तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण केला असून त्यांचा अनुभव व मार्गदर्शन भविष्यातही समाजोपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अखेरीस, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान व यशस्वी वाटचालीसाठी माननीय कुलगुरूंनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी डॉ. पेंडके यांनी कोरडवाहू शेती संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. शेततळ्यांचे आकारमान निश्चिती, मुळस्थानी जलसंधारण पद्धती, हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती तसेच विहीर व कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. मेघा जगताप, डॉ. गोपाळ शिंदे, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील व डॉ. अनिकेत वाईकर यांनीही आपल्या भाषणांतून डॉ. पेंडके यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडले.

कृषि विद्यापीठातील ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी सहाय्यक प्राध्यापक (कृषि अभियांत्रिकी), वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा व जलसंधारण), उपसंचालक (संशोधन), संशोधन संपादक तसेच कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी म्हणून प्रभावी कार्य केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. मदन पेंडके यांनी विद्यापीठातील ३३ वर्षांच्या सेवेत शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त होत असल्याने वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

या कार्यक्रमास कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मधुकर मोरे यांनी केले.