Thursday, February 19, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जिमखाना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके हे होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमशाली जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या धाडसी मोहिमा, कुशल प्रशासन, लोककल्याणकारी धोरणे तसेच रयतेच्या हितासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख नेतृत्व हे आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणासोबतच चारित्र्यनिर्माण, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे कार्य करावे, तसेच भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. नीता गायकवाड, जिमखाना उपाध्यक्ष तथा विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी, कक्ष अधिकारी श्रीमती सारिका हवालदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या लेझीम पथकाने प्रभावी सादरीकरण केले. यानंतर अपूर्वा लांडगे यांनी केलेल्या शिवगर्जनेने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

महाविद्यालयाचे विद्यार्थी गौरव नारतम व श्रावणी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार श्रावणी डोके व गौरव नरताम यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.