Thursday, February 5, 2026

वनामकृविच्या ज्वार संशोधन केंद्रास पंचवार्षिक आढावा समितीचा उत्कृष्ट अभिप्राय

यशामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन व भक्कम पाठबळ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत ज्वार संशोधन केंद्रास मागील पाच वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक आढावा समिती (Quinquennial Review Team – QRT) च्या पाहणीदरम्यान उत्कृष्ट, समाधानकारक व प्रशंसनीय असा अभिप्राय प्राप्त झाला आहे. या गौरवास्पद मान्यतेमुळे केंद्राच्या गेल्या पाच वर्षांतील दर्जेदार संशोधन कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच शेतकरीहितासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची अधिकृत दखल घेण्यात आली आहे.

या यशामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणादायी धोरणे व भक्कम पाठबळ अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील संशोधन कार्य अधिक शिस्तबद्ध, उद्दिष्टाभिमुख व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक बनले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. संशोधन व शेतकरी यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्यावर त्यांनी दिलेला भर या यशात निर्णायक ठरला आहे.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी निश्चित करून दिलेल्या संशोधनाच्या स्पष्ट दिशानिर्देशांनुसार ज्वार संशोधन केंद्राने सुधारित वाण विकास, उत्पादनवाढ, तंत्रज्ञान हस्तांतरण, शेतकरी प्रशिक्षण व विस्तार उपक्रम प्रभावीपणे राबविले.

पंचवार्षिक आढावा समितीने ज्वारीच्या सुधारित वाणांच्या विकासासाठी करण्यात आलेले संशोधन, उत्पादन व उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न, शेतकरीाभिमुख तंत्रज्ञान प्रसार, तसेच राष्ट्रीय व आंतरसंस्थात्मक संशोधन सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले. केंद्राच्या कार्यामुळे कोरडवाहू शेतीत ज्वारी पिकाची उपयुक्तता, आर्थिक स्थैर्य व अन्नसुरक्षेतील भूमिका अधिक बळकट झाल्याचेही समितीने स्पष्टपणे नमूद केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल ज्वार संशोधन केंद्राचे विद्यमान प्रमुख डॉ. अंबिका मोरे, माजी प्रमुख डॉ. लक्ष्मण जावळे, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. जे. इ. जहागीरदार तसेच संपूर्ण ज्वार संशोधन चमूचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या मान्यतेमुळे भविष्यात ज्वारी संशोधन अधिक व्यापक व प्रभावी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात, उत्पन्नात व जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.