वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील उद्यानविद्या
विभागामार्फत केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH – Mission for Integrated Development of Horticulture) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मसाला व सुगंधी पिकांच्या विकास कार्यक्रमाचा
आढावा घेण्यासाठी दिनांक २२ जुलै २०२६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरूंनी मसाला व सुगंधी पिकांचे उत्पादन
वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची
उपलब्धता, संशोधन व विस्तार यांच्यातील समन्वय अधिक बळकट
करणे तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी
अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यावर भर दिला. तसेच हा प्रकल्प समूहाधारित दृष्टिकोनातून
(Cluster Approach) प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी
दिल्या.
बैठकीस संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश
अहिरे तसेच प्रकल्पाचे प्रमुख संशोधक व उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ
खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे, विविध
केंद्रांवरील अंमलबजावणी, दर्जेदार लागवड साहित्य निर्मिती,
मसाला व सुगंधी पिकांच्या सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार
तसेच मराठवाड्यात या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची
सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत मसाला व सुगंधी पिकांचे गुणवत्तापूर्ण
रोपवाटिका साहित्य उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांपर्यंत
सुधारित तंत्रज्ञान पोहोचविणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचे कार्यक्रम प्रभावीपणे
राबविणे ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विभागातील अधिकारी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पाच्या
विविध घटकांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रात्यक्षिके, प्रशिक्षण
कार्यक्रम, रोपवाटिका विकास, शेतकरी
मार्गदर्शन आणि विस्तार उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा
करण्यात आली.
हा प्रकल्प विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागासह विविध संशोधन केंद्रे, मध्यवर्ती रोपवाटिका, कृषि महाविद्यालये आणि कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, मसाला व सुगंधी पिकांच्या उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य व सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.


.jpeg)