भारतीय संस्कृती आणि नैसर्गिक शेतीचा आधार देशी गोवंश – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या संकरीत गो-पैदास प्रकल्पाच्या वतीने दिनांक
२२ जुलै २०२६ रोजी विद्यापीठात ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात
साजरा करण्यात आला.
विद्यापीठातील संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये देशी
गोवंशाचे जतन व संवर्धन तसेच संकरीकरणाद्वारे दुग्धोत्पादन वाढविण्याच्या
उद्देशाने करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत देशी गोवंशाच्या संवर्धनाबरोबरच उत्पादन
व प्रजनन गुणधर्मांवर सातत्याने संशोधन केले जात आहे. सध्या प्रकल्पावर होलदेव व
देवणी जातींचे एकूण १६९ गोवंश असून त्यापैकी ८७ शुद्ध देवणी जातीचे आहेत. देशी
गायीचे दूध, शेण व गोमूत्र यांचे कृषी, पर्यावरण आणि
पोषणदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेऊन शासनाने देशी गोवंशाच्या संवर्धनावर
विशेष भर दिला असून देशी गायीस 'राज्यमाता गोमाता' हा दर्जा प्रदान केला आहे.
यानिमित्ताने दुपारच्या सत्रात विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या
सभागृहात मराठवाड्यातील पशुपालकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून हरितक्रांतीचे
प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस तसेच महाराष्ट्राचे माजी
उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
करण्यात आली.
अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख उपस्थितीमध्ये
संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे तसेच प्रमुख वक्ते
म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वास
साळुंखे उपस्थित होते. याशिवाय पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र
लोंढे, विभागातील प्राध्यापक, कर्मचारी,
विद्यार्थी तसेच मराठवाड्यातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भारतीय
संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत कृषी व्यवस्थेमध्ये गोवंशाचे अनन्यसाधारण
स्थान अधोरेखित केले. त्यांनी भारतीय परंपरेतील गोवंशाचे प्राचीन महत्त्व, गोरज मुहूर्ताचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व, मातीतील
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकवून
ठेवणे, तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या बळकटीकरणामध्ये
पशुधनाचे असलेले योगदान यावर सविस्तर विवेचन केले. याशिवाय देशी गोवंशाचे जतन व
संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत पशुपालन व्यवसायात महिलांचा सक्रिय सहभाग,
त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासातील त्यांची
महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत
शेतीसाठी देशी गोवंशाचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी विद्यापीठाद्वारे शुद्ध देशी गोवंश
जतन व संवर्धन यासाठीच्या कार्याचे महत्व नमूद केले.
प्रमुख वक्ते डॉ. विश्वास साळुंखे यांनी देशी गोवंशाचे वैशिष्ट्यपूर्ण
गुणधर्म, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता, हवामानाशी जुळवून
घेण्याची क्षमता, संतुलित आहार व्यवस्थापन, आधुनिक पशुधन व्यवस्थापन, पशू आरोग्य संवर्धन,
लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच
पशुपालकांनी दैनंदिन व्यवस्थापनात घ्यावयाची आवश्यक काळजी याविषयी सविस्तर
मार्गदर्शन केले. त्यांनी देशी गोवंशाचे वैज्ञानिक पद्धतीने संगोपन करून
दुग्धोत्पादनासह शेतीच्या शाश्वत विकासाला चालना देता येते, असे
प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी विद्यापीठातील संकरीत
गो-पैदास प्रकल्पामार्फत गेल्या २५ वर्षांपासून शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन तसेच
उत्पादन व प्रजनन गुणधर्मांवरील संशोधन सुरू असल्याची माहिती दिली. शेती व पशुधन
हे एकमेकांना पूरक असून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पशुधन
संवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुपालक प्रतिनिधी श्री. शिवप्रसाद मारोती कोरे (रा. राणी सावरगाव, ता. गंगाखेड),
श्री. परमेश्वर शिवमूर्ती स्वामी (रा. इटोली, ता.
जिंतूर), श्री. विजय प्रल्हादराव खिस्ते पाटील (रा.
ताडबोरगाव, ता. मानवत) तसेच श्री. रामेश्वर किशनराव मांडगे
(रा. बेलवाडी, जि. हिंगोली) यांनी मनोगत व्यक्त करत शाश्वत
शेतीसाठी पशुधनाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल गोरे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीमध्ये
पशुधनाची भूमिका स्पष्ट केली. संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी बदलत्या
हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय देशी गोवंशाचा काटकपणा, हवामानाशी जुळवून
घेण्याची क्षमता तसेच शेतीतील अवशेष व चारा संसाधनांचा प्रभावी वापर याविषयी
मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन डॉ. दत्ता बैनवाड यांनी केले, तर आभार डॉ. प्रभाकर पडघान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जी. पी. भोसले, श्री. रवी काळे, श्री. विश्वंभर शिंदे, श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, कर्मचारी, मजूर बांधव व भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.


.jpeg)
.jpeg)


.jpeg)


.jpeg)
