Thursday, July 23, 2026

वनामकृवितील संकरीत गो-पैदास प्रकल्पात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ‘शुद्ध देशी देवणी गोवंशाचे पूजन’

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या संकरीत गो-पैदास प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि. २२ जुलै २०२६ रोजी शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते शुद्ध देशी देवणी गोवंशाचे पूजन करण्यात आले.

संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये या भागातील देशी जातीच्या गायींचे संकरीकरण करून दुग्धोत्पादन वाढविणे तसेच देशी गोवंशाचे जतन व संवर्धन करणे या उद्देशाने करण्यात आली. मराठवाड्यातील प्रसिद्ध देवणी ही देशी जात दुहेरी उपयुक्ततेसाठी (दुग्धोत्पादन व शेतीकाम) विशेष ओळखली जाते. सध्या या प्रकल्पावर होलदेव व देवणी जातींचा मिळून एकूण १६९ गोवंश असून, त्यापैकी ८७ जनावरे शुद्ध देवणी जातीची आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्र. पविआ-१०२५/प्र.क्र. ११५/पदुम-३, दि. १३ जून २०२५ नुसार राज्यात दरवर्षी २२ जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशी गायीच्या दुधाचे पोषणमूल्य तसेच शेण व गोमूत्राचे कृषि आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन गायीस कामधेनू असे संबोधले जाते. महाराष्ट्रात देवणी, लाल कंधारी, खिल्लार, डांगी, कोकण कपिला, गवळाऊ व कठाणी अशा विविध देशी गोवंशाच्या जाती आढळतात. मात्र, देशी गोवंशाच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि. २० सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार देशी गायीस राज्यमाता गोमाता’ म्हणून घोषित केले आहे.

यावेळी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुद्ध देवणी गोवंशाच्या संवर्धनाबरोबरच त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच देशी गोवंशाचे संवर्धन हे शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. के. लोंढे, सहयोगी प्राध्यापक तथा प्रभारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. प्रभाकर पडघान, डॉ. रमेश पाटील, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. जी. पी. भोसले, कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. रवी काळे, कृषि सहाय्यक श्री. विश्वंभर शिंदे, पशुधन पर्यवेक्षक श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, कर्मचारी, मजूर बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.