मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत आर्थिक सहाय्यासह डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन प्रशिक्षणाची संधी
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे
प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ आणि पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यात दिनांक २३ जुलै २०२६ रोजी
ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील नागरी विमान वाहतूक
महासंचालनालय (डीजीसीए) मान्यताप्राप्त रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (आरपीटीओ)
केंद्रामार्फत हे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठातर्फे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन उपसंचालक (अर्थशास्त्र) डॉ. रणजित चव्हाण तसेच कृषि अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्री. विवेकानंद भोसले यांनी सामंजस्य
करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सारथी संस्थेच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक श्रीमती
आम्रपाली कसोडेकर, प्रकल्प अधिकारी श्री. असलम शेख व श्री. योगेश
कुदळे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून कराराची
औपचारिक पूर्तता करण्यात आली.
सामंजस्य करारानंतर सारथी संस्थेने आपल्या अधिकृत पोर्टलवर
विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेद्वारे निवड
झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आरपीटीओ केंद्रामध्ये डीजीसीए मान्यताप्राप्त
ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत
ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना
अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान, कृषि फवारणी, पीक निरीक्षण, अचूक शेती (प्रिसिजन अॅग्रिकल्चर),
भू-सर्वेक्षण आदी क्षेत्रांतील प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून रोजगार
व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे मराठवाड्यातील
युवक-युवती, विद्यार्थी आणि शेतकरी यांना शेतीमध्ये आधुनिक ड्रोन
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य प्राप्त होणार आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा
वापर वाढवून उत्पादनक्षमता व कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण
ठरणार आहे.
यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि अर्थशास्त्र
विभागाचे प्रमुख डॉ. सचिन मोरे, संशोधन उपसंचालक (पिके) डॉ. सुनिता
पवार, ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे,
ड्रोन प्रशिक्षक श्री. गोविंद दहिफळे व श्री. शितम लांडगे उपस्थित होते.
यानंतर सारथी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कृषि अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयातील डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन
तेथील प्रशिक्षण सुविधा, उपलब्ध उपकरणे व प्रशिक्षण प्रक्रियेची
पाहणी केली.
मराठवाड्यातील सर्व पात्र विद्यार्थी, युवक-युवती आणि शेतकरी यांनी सारथीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे यांनी केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)