Monday, August 25, 2025

इंदेवाडी येथे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रामकन्या व ग्रामदूत दाखल

 रावे कार्यक्रमाचा केला प्रारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाची अंमलबजावणी यावर्षी मौजे इंदेवाडी (ता. व जि. परभणी) येथे करण्यात आली आहे. या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना ‘ग्रामकन्या’ आणि ‘ग्रामदूत’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले असून ते सर्व आज, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मौजे इंडेवाडी येथे दाखल झाले आहेत.

हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार आहे. गावात दाखल होताच ग्रामकन्या व ग्रामदूत यांनी रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांच्या उपस्थितीत सरपंच श्री अशोक कच्छवे, ग्रामसेवक श्री हनुमान कच्छवे, कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी श्री संजयअण्णा सिसोदिया यांच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मदतनीस श्री माधव कच्छवे, ग्रामस्थ श्री विष्णू कच्छवे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. शंकर पुरी यांनी या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थिनींना ग्रामीण समाजाशी जोडणे, शेतकरी कुटुंबात राहून त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची जाण करून घेणे तसेच शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हे या उपक्रमामागचे प्रमुख ध्येय आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना गावातील कुटुंबांमध्ये राहण्याची संधी मिळणार असून त्यातून त्यांचे निरीक्षण, अनुभव व प्रशिक्षण अधिक परिणामकारक होणार आहे. या कुटुंबांनाही शास्त्रोक्त बालसंगोपन, संतुलित आहार व पोषण, दैनंदिन कामे करत असताना होणारे काबाडकष्ट कमी करण्याची तंत्रे, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आदी विषयांवर  हे विद्यार्थी  मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात एकूण १० आठवड्यांसाठी सुरू राहणार असल्याची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. तसेच रावे कार्यक्रमातील विविध उपक्रमांविषयी ग्रामस्थांना जागरूक करून ग्रामकन्या व ग्रामदूतांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यानंतर सरपंच श्री अशोक कच्छवे व ग्रामसेवक श्री हनुमान कच्छवे यांनी विद्यार्थिनींना संपूर्ण कार्यक्रमात सहकार्य व आपुलकीचा भाव देण्याची ग्वाही दिली. कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी श्री संजयअण्णा सिसोदिया यांनी सर्व चमूला त्यांच्या घरी नेऊन आदरातिथ्य केले. उपसरपंच श्रीमती मीरा चंदेल यांनीही या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अन्न विज्ञान व पोषण विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, साधन संपत्ती व्यवस्थापन व ग्राहक विज्ञान विभाग प्रमुख तसेच मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. निता गायकवाड, वस्त्र व परिधान अभिकल्पना विभाग प्रमुख डॉ. वीणा भालेराव आणि सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. शंकर जी. पुरी यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकीही मजबूत होईल, असा विश्वास रावे आयोजकांनी व्यक्त केला आहे.



Sunday, August 24, 2025

आधुनिक तंत्रज्ञान विकास व अवलंब यामध्ये कृषि अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

कृषि यांत्रिकीकरण, मृद व जलसंधारण, उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी कार्यक्षम वापर, कृषि मालाची प्रक्रिया व मूल्यवर्धन, नियंत्रित व काटेकोर शेती पद्धती, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर तसेच ड्रोन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान विकास व अवलंब या सर्व बाबींमध्ये कृषि अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे आयोजित कृषि अभियांत्रिकीतील उद्योगाच्या संधी” या कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके, इंजी. भालचंद्र पेडगावकर, इंजी. वैभव आजेगावकर आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविणे हे आगामी काळात मोठे आव्हान ठरणार आहे. प्रति व्यक्ती धारणा कमी होत असल्यामुळे, उपलब्ध माती व पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेतीची उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. कृषि विकासात कृषि अभियांत्रिकी पदवीधरांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. राहूल रामटेके यांनी केले. त्यांनी सांगितले की, बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) पदवीधरांना शासकीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खासगी कंपन्यांमध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच अनेक पदवीधरांनी स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे आणि डॉ. अनिकेत वाईकर यांनी करून दिला.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात इंजी. भालचंद्र पेडगावकर यांनी सांगितले की, कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना सिंचन कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. तसेच अनुभवाच्या आधारे स्वतःचा उद्योग उभारण्याचीही संधी मोठ्या प्रमाणात आहे.

इंजी. वैभव आजेगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, शिक्षण घेत असताना ध्येय ठरवून सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास हमखास यश मिळते. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना ट्रॅक्टर कंपन्या, सिंचन साधन निर्मिती, सौर ऊर्जा उपकरणे, कृषि प्रक्रिया उद्योग, हरितगृह उभारणी तसेच मृद व जलसंधारणाच्या कामांमध्ये रोजगार व उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. मदन पेंडके, डॉ. सुमंत जाधव, डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. शैलजा देशवेना, श्री. अशोक अण्णा देशवेना तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुभाष विखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. प्रमोद राठोड, विद्यार्थी समर्थ असुटकर, वरद विनोरकर, राध्येशाम खटींग, सतेज मेटकर इत्यादींनी परिश्रम घेतले.






Friday, August 22, 2025

वनामकृविच्या शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवादाच्या ६०व्या भागात सततच्या पावसानंतर पिकांच्या संरक्षणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 पाण्याचा निचरा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर ही त्रिसूत्री शेतकऱ्यांनी अवलंबवावी....

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद” या उपक्रमाचा ६० वा भाग माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २२ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमात सततच्या पावसानंतर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांमध्ये घ्यावयाची काळजी” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी सोयाबीन पिकातील रोग, खत व्यवस्थापन आणि काळजी घेण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. तसेच सहयोगी कृषिविद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकातील कीड व रोगनियंत्रण तसेच सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यांनी नमूद केले की, विद्यापीठ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी देवो भव:” या भावनेतून अविरत विस्तार कार्य करत असून आज या उपक्रमाचा ६० वा भाग अखंडितपणे यशस्वीरीत्या संपन्न होत आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्याचा हवामानाचा अंदाज सांगून पिकासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकात वाफसा स्थिती, वाढती आर्द्रता आणि अपुरे खत व्यवस्थापन यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर प्रा. अरुण गुट्टे यांनी सांगितले की, सध्या सोयाबीन पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून आर्द्रतेमुळे मुळकुज, शेंगा करपा तसेच तुर मर या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. यासाठी योग्य वेळी नियंत्रणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोग नियंत्रणासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा प्रती एकर ४ किलो वापरण्याचा सल्ला देत त्यांनी स्पष्ट केले की रासायनिक बुरशीनाशकांच्या तुलनेत जैविक बुरशीनाशकांचा परिणाम अधिक चांगला होतो. तसेच पिकाचे संरक्षण करण्यासाठी पाण्याचा निचरा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकांवरील खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण व वाढ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सततच्या पावसामुळे कापूस पिकांमध्ये आकस्मिक मर व उमळणे यांसारख्या समस्या दिसून येत आहेत. पावसामुळे मातीतील हवा खेळती नसल्याने पिकांना जमिनीतून अन्नद्रव्ये घेण्यात अडचण येत आहे. अशा परिस्थितीत ब्लू कॉपर आणि युरियाची आळवणी करून पायाने दाबण्याची पद्धत अवलंबावी, आणि हे काम २४ ते ४८ तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, विद्राव्य खतांचा योग्य वापर आणि पिकांच्या वाढ व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजनाही त्यांनी स्पष्ट केल्या.

या संवादातून शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाविषयी उपयुक्त माहिती मिळाली. याशिवाय, सद्यस्थितीतील हवामान बदलानुसार पिकांची, फळपिकांची व पशुधनाची काळजी तसेच इतर अनुषंगिक बाबींवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. दिगंबर पटाईत, प्रा. अरुण गुट्टे आणि डॉ. अरविंद पांडागळे यांनी समाधानकारक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात बैलपोळा उत्साहात साजरा

 बैलपोळ्यामुळे आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

महाराष्ट्रातील शेतकरी संस्कृतीतील महत्त्वपूर्ण असलेल्या बैलपोळा सणानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागात आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विद्यापीठ परिसरातील बैलांना स्वच्छ धुऊन, रंगीबेरंगी कापडं, गोंडे, मणीमालांनी आकर्षक सजावट करण्यात आली. शिंगांना रंग देऊन पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करण्यात आले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते बैलांचे पूजन करून नैवेद्य खावू घालण्यात आला.

कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय श्री भागवत देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता इंजिनिअर श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री प्रविण निर्मळ, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांसह विभागातील प्राध्यापक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, बैलपोळ्यामुळे आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक होते. ग्रामीण भागातील सामुदायिक ऐक्य वाढविण्यासाठी आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. शेती, बैल, पाऊस, जमीन आणि निसर्ग यांचा परस्परांशी घट्ट संबंध आहे. बैलपोळ्याद्वारे शेतकरी निसर्गाशी असलेले आपले नाते साजरे करतात, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. रमेश पाटील, डॉ. प्रभाकर पडघन तसेच आचार्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

याबरोबरच विद्यापीठ मुख्यालय आणि कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयामध्ये बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.



Thursday, August 21, 2025

हाडोळती येथील शेतकरी पवार दांपत्याला वनामकृविचे सहकार्य : बैलचलित अवजारांचा संच आणि कस्टम हायरिंग सेंटरची सुविधा

 तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणे म्हत्वाचे... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

हाडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील ७५ वर्षीय पवार दांपत्याची व्यथा काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रे व दूरदर्शन वाहिन्यांमधून व्यापक प्रसिद्ध झाली होती. बैलजोडी व शेती अवजारे नसल्याने श्री. अंबादास पवार यांची पत्नीच स्वतः शेतात सोयाबीन व कापूस पिकामध्ये कोळपणी आणि अंतर मशागत करत असल्याचे समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच प्रकल्प समन्वयक डॉ. एस. पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण या योजनेचे प्रमुख डॉ. दयानंद टेकाळे (संशोधन अभियंता), डॉ. संदेश देशमुख (पशुशास्त्रज्ञ) आणि इंजी. अजय वाघमारे (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक) यांनी शेतकरी श्री. अंबादास पवार यांच्या शेताला नुकतीच भेट देऊन त्यांच्या समस्यांची पाहणी केली.

श्री. पवार यांच्या साडेचार एकर शेतीची माहिती घेतल्यानंतर, विद्यापीठामार्फत त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी पवार यांनी सध्या बैलजोडी असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यापीठाने त्यांना बैलचलित अवजारांचा संपूर्ण संच देण्याचे निश्चित केले. यामध्ये क्रीडा टोकण यंत्र, तीन पासांचे कोळपे, धसकटे गोळा करणारे अवजार, सरी पाडण्याचे अवजार तसेच सौरऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र यांचा समावेश आहे.

यानिमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना दिलासा देणे म्हत्वाचे असून हीच खरी विद्यापीठाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्प समन्वयक डॉ. एस. पी. सिंग यांनी सांगितले की, ही अवजारे केवळ पवार यांच्यापुरतीच मर्यादित न राहता गावातील इतर अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही उपयोगी पडावीत यासाठी कस्टम हायरिंग सेंटर स्थापन करून शेतकऱ्यांच्या समूहाला ही अवजारे वापरण्यास दिली जातील. यामुळे श्री. पवार यांना आर्थिक मदत तर मिळेलच, शिवाय गावातील इतर शेतकऱ्यांनाही या अवजारांचा लाभ घेता येईल.

या भेटीदरम्यान हाडोळती गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.




अतिवृष्टीनंतर खरीप पिकांची घ्यावयाची काळजी बाबत वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला


ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात सतत पाऊस झाल्याने तसेच बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पुढे नमुद केलेल्या उपाय योजना करून सोयाबीन, कापूस,तूर व हळद पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे.असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत व श्री.एम.बी.मांडगे यांनी केले आहे.

सोयाबीन

सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा. या वातावरणामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक 2 किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे.

सध्या सर्वत्र सोयाबीन फुले तसेच काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे.

सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.

-            क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5% - 60 मिली (3 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर

किंवा

-            इंडाक्झाकार्ब 15.8% - 140 मिली (7 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर

किंवा

-            असिटामाप्रीड 25%+ बाईफैंन्थ्रीन 25% -100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) प्रति एकर

किंवा

-            क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.60% - 80 मिली (4 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर

किंवा

-            आयसोसाक्लोसिरम 9.2% - 240 मिली (12 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर

तसेच येणाऱ्या काळात शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन टेब्युकोनॅझोल 10%+ सल्फर 65% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% -250 मिली ( 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150  ते 200 ग्रॅम ( 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3%+ इपिक्साकोनाझोल 5% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली ( 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) प्रति एकर फवारावे.

तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी युक्त औषधाची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

कपाशी

कापूस पिकामध्ये अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत. शक्य असेल तिथे वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास 200 ग्रॅम युरिया+ 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत )+25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी.

वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

पिकाची वाढ पुर्ववत होऊन पाते लागण होण्यासाठी पिक 60 दिवसाचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. त्यासाठी  कोरडवाहू कपाशीकरीता 31 किलो तर बागायती कपाशीकरीता 51 किलो निमकोटेड यूरीया प्रति एकरी द्यावा. कापूस सध्या पाते व बोंडे अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर नैसर्गिक पातेगळ होत असेल तर याच्या नियंत्रणाकरीता एनएए या संजीवकाची 40 मिली प्रति 180 लिटर पाणी या प्रमाणे प्रति एकरी किंवा 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी यामुळे नैसर्गिक पातेगळ थांबण्यास मदत होते. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रस शोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात. सध्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून ‘आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% - 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.’ (ॲग्रेस्को शिफारस).

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग म्हणजेच *बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब 70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

तुर

तुर हे पीक जास्त पाऊसास संवेदनशील आहे. म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहीलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. तुर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मर ग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी तसेच चारही बाजूनी एक मिटर अंतरावर कार्बेडेंझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. तसेच जिथे कुठे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम अधिक युरीया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेवून झाडांच्या मुळांना प्रति झाड 100 मिली द्यावे. तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

हळद

सध्याच्या वातावरणामध्ये हळदीवर कंदमाशी या किडीचा आणि पानावरील ठिपके, करपा व कंदकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.

कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक 15 दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस 25%- 400 मिली (20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा डायमिथोएट 30%- 300 मि.ली. (15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात)* यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस 50%- 1000 मिली (50 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात)  घेऊन प्रति एकरी या प्रमाणात आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.

पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापनासाठी - करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.

रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

प्रादुर्भाव कमी असल्यास –

-            कार्बेडेंझीम 50% - 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

किंवा

-            मॅन्कोझेब 75% -500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

किंवा

-  कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव जास्त असल्यास

-            एजोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात)

किंवा

-            प्रोपीकोनॅझोल 25% - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात)

किंवा

-            क्लोरथॅलोनील 75% - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी - प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.

जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

कंदकूज झाली असल्यास जमिनीतून

कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा

मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा

कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.

(आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.) (संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

सर्व पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी

कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये. फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.

वनामकृवि संदेश क्रमांक- 04/2025 (21 ऑगस्ट 2025)