Monday, August 11, 2025

नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी ५४ कृषि सखींना पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; वनामकृविच्या बदनापूर येथील कृषि विज्ञान केंद्राचा उपक्रम

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे कृषि सखींना मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र बदनापूर आणि आत्मा कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ५४ कृषि सखींसाठी पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दिनांक ११ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे, अधिष्ठाता डॉ. दिपक पाटीलआत्माचे प्रकल्प संचालक श्री. अमोल आगवान, कार्यक्रम समन्वयक डॉ . दिप्ती पाटगावकर (छ.संभाजीनगर) डॉ. सचिन सोमवंशी (बदनापूर) यांची उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित कृषि सखींना मार्गदर्शन करताना सांगितले की, या प्रशिक्षणादरम्यान अभ्यास व अवलोकन करून शेतकऱ्यांना योग्य माहिती संक्षिप्त स्वरूपात देता यावी. हा कार्यक्रम केवळ मार्गदर्शनापुरता न राहता, कौशल्यविकासासाठी प्रात्यक्षिक स्वरूपात आयोजित करावा, असेही त्यांनी सुचविले. कारण, जोपर्यंत सर्व कृषि सखींना नैसर्गिक शेतीच्या संकल्पना पूर्णपणे अवगत होत नाहीत, तोपर्यंत त्या त्याचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे करू शकणार नाहीत. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हा देशाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, सध्या रासायनिक शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता आणि मानवाचे आरोग्य दोन्ही प्रभावित झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज असून, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले. या प्रशिक्षणामध्ये महिला कृषि सखींना नैसर्गिक शेतीविषयी सखोल माहिती आणि प्रात्यक्षिकांवर विशेष भर द्यावा, असे त्यांनी सुचविले. तसेच, भविष्यात या महिलांनी कृषि विज्ञान केंद्र व कृषि विद्यापीठाशी संपर्क ठेवून अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमादरम्यान माननीय कुलगुरूंनी विद्यापीठ-निर्मित ‘बायोमिक्स’ व नैसर्गिक शेतीविषयक मार्गदर्शिका कृषि सखींना प्रातिनिधिक स्वरूपात देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच कार्यक्रमानंतर  त्यांच्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमातून कृषी साखींची  क्षमता बांधणी योग्य मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून केली जाईल. महिला या भारतीय शेतीपद्धतीचा अविभाज्य भाग असल्याने, कृषी साखींची माध्यमातून नैसर्गिक शेतीसंबंधीची माहिती परिणामकारकरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, यात शंका नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.सचिन सोमवंशी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत थोडक्यात माहिती दिली. आणि 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान' दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू करण्यात आले असून यामध्ये ७५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच १५,००० गट तयार करण्याचे नियोजन असून प्रत्येक गटासाठी ५० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. आणि एका गटासाठी दोन कृषि सखींची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कृषि सखींमार्फत संबंधित गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कृषि सखींना तांत्रिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी या पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच, या कृषि सख्यांना भविष्यात देखील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आत्माचे प्रकल्प संचालक श्री. अमोल आगवान यांनी नैसर्गिक शेतीसंबंधीची आजच्या काळातील गरज यावर कृषि सखीना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आत्माचे श्री. पारडे, श्री. धैर्यशील पाटील, श्री. मोरे आणि श्रीमती खरात हे तंत्रज्ञान समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल कदम यांनी केले तर आभार डॉ. सचिन धांडगे यांनी मानले.