Tuesday, August 12, 2025

वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ब्रह्मकुमारी सुप्रिया यांचे व्याख्यान

 निसर्गाशी जुळवून घेऊन जीवनात समतोल साधण्याचा दिला संदेश


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासा अंतर्गत ब्रह्मकुमारी केंद्र, परभणी व जिमखाना विभाग यांच्या वतीने निसर्गासोबत संतुलन पुनर्स्थापित करणे या विषयावर दिनांक १२ ऑगस्ट रोजी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. पुण्यातील इंजिनीअर ब्रह्मकुमारी सुप्रिया यांनी विद्यार्थ्यानां या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.

ब्रह्मकुमारी सुप्रियां यांनी मानवी नात्यांतील सौहार्द, परस्पर विश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व समजावले. त्यांनी आत्मजाणीव, मानसिक संतुलन आणि आत्मविकासाचा वैयक्तिक व व्यावसायिक यशाशी असलेला घट्ट संबंध यावर प्रकाश टाकला. तसेच, पाच तत्त्वे जसे अग्नि, पाणी, वायु, पृथ्वी आणि आकाश यांचा जीवनातील महत्त्व आणि त्यांचा समतोल व्यक्तिमत्व विकासासाठी कसा उपयुक्त ठरतो हे स्पष्ट केले. त्याचबरोबर, निसर्गाशी आपला संबंध आणि प्रदूषणामुळे आपल्या आयुष्यात होणा­या परिणामांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. पर्यावरणाची काळजी घेणे, प्रदूषण कमी करणे आणि निसर्गाशी सुसंवाद राखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांनी केले. कु.किंजल मोरे यांनी प्रमुख पाहूण्याची ओळख करून दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम खटींग यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे केले. प्रमुख उपस्थितींमध्ये ब्रह्मकुमारी परभणी केद्राचे संचालक अर्चना दिदीजी तसेच, डॉ. बाळासाहेब रोडगे, सीमा बहनजी, श्री तांदळे भाई आणि भोसले भाई इत्यादी हजर होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. सुमंत जाधव, डॉ. मधुकर मोरे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. गजानन वसू  तसेच प्रथम वर्षाचे विद्यार्थी राम शेंडगे, सतेज मेटकर इत्यादींनी परिश्रम घेतले.