उपक्रमास विद्यापीठामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आश्वासन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान
संकुलाच्या ॲट्रीयम सभागृहामध्ये प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, पुणे यांच्या
मार्फत परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरित करण्यात आलेल्या सुहाना फिरती
विज्ञान प्रयोगशाळा बसचा लोकार्पण सोहळा दिनांक १८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मा.
श्री राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रश्मी
खांडेकर, तसेच इस्त्रोचे माजी तंत्रज्ञ श्री. भानुदास कवडे
यांची उपस्थिती होती.
सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, पुणे व परभणी
ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम असून, ट्रस्टमार्फत
बसचे रूपांतर सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेत करून ती सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात
आली आहे. या बसमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व
जीवशास्त्र विषयांशी संबंधित प्रत्यक्ष प्रयोगांसाठी लागणारे साहित्य व उपकरणे
उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सदर बस जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जाऊन
विद्यार्थ्यांना प्रयोग प्रत्यक्ष दाखवणार आहे. याकरिता सोसायटीमार्फत विज्ञान
संवादकाची नेमणूक करण्यात आली असून ते विद्यार्थी व शिक्षकांसमोर प्रयोगांचे
प्रात्यक्षिक करून दाखवतील.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्री.
चोरडिया यांच्या दातृत्वाचा भावपूर्ण उल्लेख करून, ते धर्मशास्त्राप्रमाणे कार्य करत
असल्याचे सांगितले व या उपक्रमास विद्यापीठामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे
आश्वासन दिले.
उद्घाटक श्री. राजकुमार चोरडिया यांनी परभणी जिल्हा मानव विकास
निर्देशांकात मागे असल्याने हा जिल्हा निवडला असून, समान विचारसरणी व निस्वार्थ भावनेने
कार्य करणाऱ्या परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीसोबत हा उपक्रम राबवताना समाधान होत
असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष प्रयोग करण्याची
संधी उपलब्ध होऊन त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, असे ते
म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रश्मी खांडेकर यांनी या प्रकल्पाचे नावीन्य
अधोरेखित करत जिल्हा परिषद प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन
दिले. श्री. कवडे यांनी या प्रयोगशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये
विज्ञान विषयाची आवड निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी
मा. चोरडिया यांच्या दातृत्व वृत्तीचा गौरव करून या उपक्रमाची माहिती सर्वांना
दिली व यशस्वीतेसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक, पालक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन श्री. नितीन लोहट यांनी केले, तर आभार प्रदर्शन
सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने
झाली व मान्यवरांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून फिरती विज्ञान प्रयोगशाळाचे
औपचारिक लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲस्ट्रॉनॉमिकल
सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.