Tuesday, August 19, 2025

वनामकृवि येथे सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न – मुलाखतीसाठी तयारी व करिअरमधील आयटी क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन

 आनंद हा जीवनातील सर्वात मोठा आधार – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व संलग्न महाविद्यालयांतील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगती व व्यक्तिमत्व विकास उपक्रमांतर्गत सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक १९ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, पुणे शाखेतील प्रख्यात तज्ज्ञ श्री. अंबरीश व प्रियांका गांधी आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आनंद हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लोक आपला आनंद कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या नकारात्मक हेतूंचा आपल्यावर परिणाम होऊ दिला नाही, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो,” असे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, आपल्या जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. मन:शांती आणि आनंद यांचा जीवनातील प्रत्येक निर्णयाशी घनिष्ठ संबंध आहे. जर आपण सकारात्मक विचारसरणी अंगीकारली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला, तर यश संपादन करणे सोपे होते.

अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून प्रास्तविक केले. यावेळी त्यांनी मनुष्याच्या आयुष्यात सॉफ्ट स्किल्स असणे अत्यंत गरजेचे आहे. आज विद्यार्थी मुलाखत देण्यासाठी पुढे सरसावतात; मात्र मुलाखत कशी द्यायची, रिझ्युमे कसा तयार करायचा याबाबत त्यांच्यात कमतरता आढळून येते. अशा वेळी अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते, असे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीत न थांबता संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासाने स्वतःला सादर करण्यास मदत होईल, तसेच करिअरच्या संधींसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही डॉ. प्रविण वैद्य यांनी स्पष्ट केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे शाखेतील प्रख्यात तज्ज्ञ प्रियांका गांधी व श्री. अंबरीश यांनी “मुलाखतीची तयारी व रेझ्युमे लेखन” या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्त्या प्रियांका गांधी यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांची सविस्तर माहिती दिली. मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नसून स्वतःची ओळख प्रभावीपणे सादर करण्याची संधी आहे, असे त्या म्हणाल्या. यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन, योग्य अंगभाषा व उत्तम सादरीकरण महत्त्वाचे ठरते, यावर त्यांनी भर दिला. तसेच चांगले रेझ्युमे कसे तयार करावे, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, कौशल्ये व अनुभव यांचे संक्षिप्त परंतु प्रभावी वर्णन कसे करावे, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

दुसरे वक्ते श्री. अंबरीश यांनी कृषिक्षेत्रातील माहिती-तंत्रज्ञानाचा वाढता वापर अधोरेखित केला. आज कृषिक्षेत्रात अचूक शेती, डेटा अॅनालिटिक्स, ड्रोन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे कृषिविद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक रोजगारापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता आयटी क्षेत्राकडेही करिअरच्या नव्या संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धीरज पाथ्रिकर यांनी उत्साहपूर्ण पद्धतीने केले.शेवटी डॉ. अनुराधा लाड यांनी आभार प्रदर्शन करून मान्यवरांचे तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले. या प्रशिक्षण सत्रामुळे विद्यार्थ्यांना मुलाखत व करिअर नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण दिशा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी नांदेड सेव्हन मी मेंटरचे मॅनेजर श्री सचिन नरंगले, कौन्सलर वैष्णवी जाजू, विद्यापीठ परिसरातील १५० हून अधिकारी आणि विद्यार्थी यांनी या विशेष व्याख्यानाला उपस्थित राहून  लाभ घेतला.