कार्यशाळा शेतकरी आणि विस्तार अधिकाऱ्यांमधील संवाद अधिक मजबूत करतात.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातर्फे
‘क्रॉपसॅप’ योजनेअंतर्गत लातूर विभागातील नांदेड, परभणी व
हिंगोली जिल्ह्यांतील कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय विशेष
कीड व रोग सर्वेक्षण कार्यशाळा दि. ६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,
सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैघ, कीटकशास्त्र
विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, क्रॉपसॅप समन्वयक डॉ.
अनंत लाड, तसेच हिंगोलीचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री.
प्रदीप कच्छवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत ९० हून अधिक कृषि अधिकारी व
कर्मचारी सहभागी झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, विद्यापीठ ‘शेतकरी
देवो भवः’ या भावनेवर कार्य करत असून, शेतकरी हा कार्याचा
केंद्रबिंदू आहे. शाश्वत शेतीसाठी पर्यावरणपूरक व वैज्ञानिक पद्धतीने कीड
व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. संशोधन, शिक्षण व विस्तार ही
तिन्ही यंत्रणा एकत्रित काम करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत.
विद्यापीठाचे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाचे असून अशा
कार्यशाळा शेतकरी आणि विस्तार अधिकाऱ्यांमधील संवाद अधिक मजबूत करतात, असेही त्यांनी नमूद केले.
तांत्रिक सत्रात डॉ. बी. व्ही. भेदे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी, रसशोषक किडी आणि
इतर कीटकांचे स्वरूप, आर्थिक नुकसानीची पातळी, फेरोमोन ट्रॅपचा वापर व समन्वित कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ.
आर. एस. जाधव यांनी सोयाबीनमधील प्रमुख कीडींची ओळख, लक्षणे
व व्यवस्थापनाची माहिती दिली. डॉ. ए. जी. लाड यांनी ऊस, मका,
ज्वारीवरील किडींचे सर्वेक्षण, आर्थिक पातळीचे
मूल्यांकन व व्यवस्थापन उपाय सविस्तर सांगितले.
यानंतर प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. यामध्ये शेतातील कीडी
व रोगांचे थेट निरीक्षण, नोंदी भरण्याची पद्धत, आर्थिक नुकसानाची पातळी
ओळखण्याची प्रक्रिया, कामगंध सापळ्यांचा वापर व निरीक्षण
अहवाल तयार करण्याचे मार्गदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ.
मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड, डॉ.
राजेंद्र जाधव, डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश म्हात्रे
यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले, तर आयोजनात डॉ.
राजरतन खंदारे, डॉ. योगेश म्हात्रे, श्री.
बालाजी कोकणे, श्री. दीपक लाड व श्री. भारतरत्न घुगे यांचे
योगदान लाभले.