Wednesday, August 27, 2025

गणेशोत्सव आनंद, ऐक्य आणि संस्कारांचा उत्सव — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात  येत आहे. यानिमित परभणी येथील कृषि महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि श्रीमती जयश्री मिश्रा यांच्या शुभहस्ते श्री गणपती बाप्पांची स्थापना व पूजा विधी पार पडली. या प्रसंगी विद्यापीठ परिसर गणेशमय झाला होता.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन विद्यापीठाच्या प्रगतीसाठी, शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी  शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. एम. जी. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन बाप्पाची आरती करून वातावरण भक्तिमय केले.

कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, गणेशोत्सव हा आनंद, एकात्मता आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे. विद्यापीठाच्या परिवाराने एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केल्याने आपुलकीची भावना वृद्धिंगत होते. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच संस्कारांचा वारसा जोपासावा, हाच खरा गणरायाचा आशीर्वाद आहे. माननीय कुलगुरू यांनी बाप्पाचे दर्शन घेतले व विद्यापीठातील सर्वांसाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

श्री गणपती स्थापनेनंतर पारंपरिक विधी, पूजा-अर्चना, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेतून सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला.

या सोहळ्याला विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. गणेशोत्सवाच्या या पावन सोहळ्यामुळे विद्यापीठ परिसरात भक्तिमय, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.