Wednesday, August 20, 2025

भावनिक संतुलन, सद्भावना व सकारात्मक दृष्टिकोन यांची आजच्या काळात नितांत गरज: माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने परभणी मुख्यालयातील अधिकारी आणि विद्यार्थ्यासाठी  शैक्षणिक समृद्धी व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांतर्गत “प्रभावी नेतृत्व, भावनिक बुद्धिमत्ता व तणाव व्यवस्थापन” (Effective Leadership, Emotional Intelligence and Stress Management) या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे दिनांक २० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. तर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख वक्त्या म्हणून भोपोडी (पुणे) येथील शिवशक्ती भवन, ब्रह्मकुमारीच्या संचालिका डॉ. बी. के. लक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भावनिक संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, भावनिक असंतुलनामुळे अनेकदा चुकीची कार्ये घडतात व त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात, परिणामी पश्चातापाला सामोरे जावे लागते. आपल्याकडे जे आहे त्यावर समाधान न मानता जे नाही त्याच्यावर विचार केल्यामुळेच दुःख वाढते, असे सांगताना कुलगुरूंनी आपसातील संवादाचे महत्त्वही स्पष्ट केले. त्यांनी नमूद केले की, संवादातून मनःशांती लाभते आणि याचाच खरा उद्देश “ओम शांती” आहे. माउंटआबू येथे ओम शांती परिवारामार्फत घेतलेल्या सात दिवसीय प्रशिक्षणाचा अनुभवही त्यांनी सांगितला व तो अत्यंत लाभदायक ठरल्याचेही अधोरेखित केले. ओम शांतीचे कार्य शास्त्रीय दृष्टिकोनातून होत असून त्याचे आचरण प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करताना, माननीय कुलगुरूंनी सध्याच्या अशांत व अस्थिर जीवनात मानसिक संतुलनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व दुसऱ्यांप्रती आदरभाव ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. दुसऱ्यांप्रती द्वेषभावना किंवा मत्सर बाळगल्याने आपण स्वतःच त्रस्त होतो, ज्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे इतरांविषयी सद्भावना व प्रेम जोपासावे, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या सद्भावना दिनाचेही त्यांनी स्मरण करून दिले. “दया, क्षमा, करुणा ही तत्त्वे जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे. आपल्या शास्त्रातही सांगितले आहे की, ज्यांच्याकडे ज्ञान, शील, सद्गुण, धर्म, तप आहेत त्यांनाच खऱ्या अर्थाने मनुष्य म्हटले जाते; अन्यथा तो पशुसमान आहे, असेही माननीय कुलगुरूंनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी विविध छंद जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे व्यायाम, खेळ, कला, चांगले संगीत यामुळे मन प्रफुल्लित राहते आणि आत्मविश्वास वाढतो. ते पुढे म्हणाले की, भावनिक संतुलन राखण्यासाठी राजयोग मेडिटेशन खूप महत्त्वाचे ठरते. जीवनात यश मिळवण्यासाठी नेहमी कार्यमग्न राहा, मात्र कार्य करताना फळाची अपेक्षा ठेवू नका. वेळ लागेल पण योग्य परिश्रमांचे फळ नक्कीच मिळेल.

प्रमुख वक्त्या व संचालिका डॉ. बी. के. लक्ष्मी यांनी आपल्या व्याख्यानात नेतृत्वगुणांचा विकास, भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व तसेच शैक्षणिक व व्यावसायिक जीवनातील तणावाचे व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन, प्रभावी संवादकौशल्ये आणि आत्मनियंत्रणाच्या गरजेवर विशेष भर दिला.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. प्रा. लक्ष्मी यांची प्रेरणादायी विचारधारा आजच्या पिढीसमोर जीवनमूल्ये, सकारात्मकता आणि सहिष्णुतेचा आदर्श ठेवणारी ठरली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून व्यक्तिमत्व विकास, भावनिक संतुलन आणि ध्यानधारणा याबाबत मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले.