उच्च दर्जेचे कलाकार विद्यापीठातून घडतील....माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील सुप्त
कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य वाव मिळावा, या उद्देशाने
विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट रोजी ‘आनंदघन’ चित्रप्रदर्शनाचे
आयोजन कृषि महाविद्यालय, परभणी येथे करण्यात आले. हे प्रदर्शन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या मार्गदर्शनानुसार आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम
यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
शुभहस्ते झाले. १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, विद्यापीठातील कला
रसिक विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. प्रदर्शनामध्ये निसर्गचित्र
(Landscape Painting), व्यक्तिचित्र (Portrait Painting),
संकल्पचित्र (Designing), व्यंगचित्र (Cartooning),
मूर्ती काम (Clay Modeling), हस्तकला (Craft)
अशा विविध कलाप्रकारांना स्थान देण्यात आले आहे. या सर्व
कलाप्रकारांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उत्सुकतेने पाहणी करून
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याद्वारे उच्च दर्जेचे कलाकार या विद्यापीठातून घडतील
अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्घाटनप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता
श्री. दीपक कशाळकर, सन्माननीय अतिथी सौ. जयश्री मिश्रा,
सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रविण वैद्य, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश
क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके तसेच विविध विभागांचे प्रमुख,
प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठातील सर्व घटक महाविद्यालये आणि संलग्न महाविद्यालयांतील
विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने
परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार विविध महाविद्यालयांतील ४०
विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती या प्रदर्शनात सादर केल्या. प्रदर्शनाचे यशस्वी
आयोजन व आकर्षक मांडणी करण्यात विद्यापीठाचे वरिष्ठ कलाकार श्री. अमोल सोनकांबळे
यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळून त्यांना आपल्या
कलाकृती अधिक व्यापक पातळीवर सादर करण्याची मौल्यवान संधी उपलब्ध झाली.