सध्याच्या परिस्थितीत मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमान
सरासरीपेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील मुख्य पिके जसे कापूस, सोयाबीन, मुग, उडीद आणि तूर या पिकांना पाण्याचा ताण भासत
आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांनी विद्यापीठांतर्गत असलेल्या कोरडवाहू
शेती संशोधन केंद्राने विकसित केलेल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून
पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वयित
कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक १२ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने
आयोजित एक दिवसीय आपत्कालीन पीक नियोजन कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमास
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश
अहिरे तसेच केंद्रीय कोरडवाहू शेती संस्था, हैद्राबाद येथील
प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक श्री. पी.
आर. देशमुख (छत्रपती संभाजीनगर) आणि श्री. साहेबराव दिवेकर (लातूर), सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी
अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय मराठवाडा विभागातील सर्व कृषी
विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ देखील सहभागी झाले होते.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाविषयी
मार्गदर्शन करताना पोटॅशियम नायट्रेटची फवारणी, उभ्या पिकांना सऱ्या काढणे तसेच
शेततळ्यातील पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर करणे अशा उपाययोजना सुचविल्या. विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपत्कालीन
परिस्थितीत शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसंबंधी मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक डॉ.
जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांनी कोरडवाहू शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत
माहिती दिली. श्री. पी. आर. देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील
पर्जन्यमानाचा आढावा सादर करून सद्यस्थितीतील पिकांची माहिती दिली.
मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी कोरडवाहू शेती संशोधन
केंद्राने प्रसारित केलेले तंत्रज्ञान व सद्यस्थितीत करावयाच्या उपाययोजनांविषयी
सादरीकरण केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी मराठवाडा विभागातील
पर्जन्यमानाविषयी सादरीकरण करून पावसाच्या खंडकाळाचे विश्लेषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.
पपीता गोरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील डॉ.
रावसाहेब राऊत, डॉ. मदन पेंडके आणि डॉ. गणेश गायकवाड यांचा सहभाग होता.