Thursday, August 14, 2025

वनामकृविच्या अन्नतंत्र महाविद्यालयात अन्नसुरक्षा गुणवत्ता लेखापरीक्षण व मानांकन विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

 सुरक्षित अन्न ही काळाची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालय व नवी मुंबई येथील आस्क सेफ फूड सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, बी.टेक (अन्नतंत्रज्ञान) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अन्नप्रक्रिया उद्योगाशी निगडित अन्नसुरक्षा गुणवत्ता लेखापरीक्षण व मानांकन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दिनांक ११ ते १३ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात पार पडली.

कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. कार्यशाळेत अन्नसुरक्षा मानके HACCP, ISO 22000, FoSTaC तसेच संवेदी मूल्यांकन या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आस्क सेफ फूड सोल्युशन्स प्रा. लि. तर्फे मुख्य लेखापरीक्षक डॉ. संजय इंदानी व श्री. आदित्य शेट्टी यांनी अंतर्गत लेखापरीक्षण व विविध मानांकन प्रक्रियेवर परस्परसंवादी सत्रे घेतली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. आसेवार यांनी दैनंदिन जीवनातील अन्नसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. औद्योगिक प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगातील विविध मानकांची सखोल माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

याबरोबरच निरोप समारंभात अध्यक्षस्थानी असलेल्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी अन्नाचा वाटा ३० टक्के असतो, परंतु अन्नसुरक्षेचा वाटा ७० टक्के आहे. त्यामुळे सुरक्षित अन्न ही काळाची गरज असून अन्नभेसळ रोखणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यवसायिक विकासासाठी महाविद्यालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोग अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. आर. बी. क्षीरसागर यांनी केले. समन्वयक म्हणून डॉ. बी. एस. आगरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख व प्राध्यापकवर्ग यांचे सहकार्य लाभले, तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांचेही मोलाचे योगदान राहिले. उद्घाटन व निरोप समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका डॉ. पी. पी. ठाकूर यांनी केले.