पाण्याचा निचरा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर ही त्रिसूत्री शेतकऱ्यांनी अवलंबवावी....
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि शासनाच्या कृषि विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने, कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत “शेतकरी
- शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद” या उपक्रमाचा ६० वा भाग माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २२ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या पार
पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे
यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात “सततच्या पावसानंतर सोयाबीन, कापूस आणि तूर
पिकांमध्ये घ्यावयाची काळजी” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विस्तार कृषि
विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी सोयाबीन पिकातील रोग, खत
व्यवस्थापन आणि काळजी घेण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. तसेच सहयोगी
कृषिविद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकातील कीड व रोगनियंत्रण तसेच
सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत
देशमुख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यांनी नमूद केले की, विद्यापीठ माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली “शेतकरी
देवो भव:” या भावनेतून अविरत विस्तार कार्य करत असून आज या उपक्रमाचा ६० वा भाग
अखंडितपणे यशस्वीरीत्या संपन्न होत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी
आठवड्याचा हवामानाचा अंदाज सांगून पिकासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकात वाफसा स्थिती, वाढती आर्द्रता
आणि अपुरे खत व्यवस्थापन यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास
आले. या पार्श्वभूमीवर प्रा. अरुण गुट्टे यांनी सांगितले की, सध्या सोयाबीन पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून आर्द्रतेमुळे मुळकुज,
शेंगा करपा तसेच तुर मर या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
यासाठी योग्य वेळी नियंत्रणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट
केले. रोग नियंत्रणासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा प्रती एकर ४ किलो
वापरण्याचा सल्ला देत त्यांनी स्पष्ट केले की रासायनिक बुरशीनाशकांच्या तुलनेत
जैविक बुरशीनाशकांचा परिणाम अधिक चांगला होतो. तसेच पिकाचे संरक्षण करण्यासाठी पाण्याचा
निचरा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर
या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकांवरील खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण व
वाढ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सततच्या पावसामुळे कापूस पिकांमध्ये आकस्मिक मर व उमळणे यांसारख्या समस्या
दिसून येत आहेत. पावसामुळे मातीतील हवा खेळती नसल्याने पिकांना जमिनीतून
अन्नद्रव्ये घेण्यात अडचण येत आहे. अशा परिस्थितीत ब्लू कॉपर आणि युरियाची आळवणी
करून पायाने दाबण्याची पद्धत अवलंबावी, आणि हे काम २४ ते ४८
तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, विद्राव्य खतांचा योग्य वापर आणि पिकांच्या वाढ व्यवस्थापनासाठी प्रभावी
उपाययोजनाही त्यांनी स्पष्ट केल्या.
या संवादातून शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच आधुनिक
तंत्रज्ञानाविषयी उपयुक्त माहिती मिळाली. याशिवाय, सद्यस्थितीतील
हवामान बदलानुसार पिकांची, फळपिकांची व पशुधनाची काळजी तसेच
इतर अनुषंगिक बाबींवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.
पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. दिगंबर पटाईत, प्रा. अरुण गुट्टे आणि डॉ. अरविंद पांडागळे यांनी समाधानकारक उत्तरे देऊन
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी
कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम
नेहरकर यांनी मानले.