Friday, August 29, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

मेजर ध्यानचंद यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करावे... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला. खेलेगा देश, खिलेगा देश / एक तास खेळाच्या मैदानावर” या घोषवाक्याखाली विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

ऑनलाइन मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, मेजर ध्यानचंद यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उत्तुंग यश संपादन करावे. क्रीडेमुळे शिस्त, एकात्मता आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे खेळांना वेळ द्यावा.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात मेजर ध्यानचंद यांचे खेळासाठी असलेले समर्पण अधोरेखित केले. ते म्हणाले, देशासाठी खेळणे आणि मातृभूमीची सेवा करणे हे कोणत्याही पदापेक्षा किंवा भौतिक लाभापेक्षा श्रेष्ठ आहे. तसेच विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास व्यायाम किंवा खेळांसाठी द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात मेजर ध्यानचंद यांचे कर्तृत्व आणि नम्रता देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, मेजर ध्यानचंद यांचा वारसा हा हॉकी खेळातील त्यांच्या पराक्रमापेक्षा जास्त बोलका आहे. तो आवड, समर्पण आणि खेळांमधून जीवनातील मूल्यांची जाण देणारा आहे.

या कार्यक्रमात डॉ. संघर्ष शृंगारे यांनी उपस्थितांना दररोज व्यायाम व खेळांची शपथ दिली. त्यानंतर रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच योग शिक्षक श्री. अशोक तळेकर आणि डॉ. दीपक महेंद्रकर यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले.

या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.