Friday, August 15, 2025

राष्ट्र विकासामध्ये सक्रिय सहभाग हीच खरी स्वातंत्र्यवीरांना आदरांजली

 वनामकृवित ७९ वा स्‍वातंत्र्य दिन उत्‍साहात साजरा




देशात एकेकाळी अन्नधान्याचा तुटवडा होता, पण आज आपण विक्रमी साडेतीनशे दशलक्ष टन उत्पादन घेत आहोत. या प्रगतीत आपले सर्वांचे योगदान आहे, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७९ वा स्‍वातंत्रदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

माननीय कुलगुरू पुढे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले संविधान २६ जानेवारी १९५० पासून लागू झाले आणि सुराज्य निर्मितीची वाटचाल सुरू झाली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील थोर संतांच्या कार्याचा उल्लेख करून अभिवादन केले. स्वातंत्र्यसंग्रामात आणि देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. गेल्या वर्षी कृषि क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्याला देशपातळीवर उत्कृष्ट राज्य म्हणून गौरविण्यात आले. विद्यापीठ देखील मागील तीन वर्षांपासून शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात सातत्याने प्रगती करत आहे. गौरवशाली विद्यापीठ निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण अहोरात्र कार्यरत आहोत. याच प्रयत्नांची दखल घेऊन भारतीय कृषि  अनुसंधान परिषदेने विद्यापीठास उच्चांकी ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. महाराष्ट्रातील कृषि  विद्यापीठांमध्ये सर्वात अग्रेसर मानांकन हे विद्यापीठाने प्राप्त केले आहे.

विद्यापीठाने तुर, सोयाबीन, कापूस आणि श्रीअन्न (भरडधान्य) या पिकांमध्ये संशोधन व विस्तार कार्य राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकावर केले आहे. सध्या विद्यापीठात ५०० एकर क्षेत्रावर सघन बीटी कापसाची लागवड करण्यात आली असून त्यामध्ये संपूर्ण यांत्रिकीकरणाचा अवलंब केला जात आहे. अशा उपक्रमांची स्तुती आणि चर्चा देशपातळीवर होत आहे.

विद्यापीठ नियमितपणे राष्ट्रीय स्तरावरील विस्तार कार्यासाठी महोत्सव आणि मेळावे आयोजित करत असते. येत्या सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशातील जवळपास ७५ कृषि  विद्यापीठांच्या कुलगुरूंचे संमेलन विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकरी प्रभावीपणे अवलंबत असून, मराठवाड्यातील शेती विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे.

राष्ट्र व विद्यापीठाच्या विकासामध्ये आपला सक्रिय सहभाग हीच खरी स्वातंत्र्यवीरांना आदरांजली आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन आपण दरवर्षी अतिशय उत्साहात साजरा करतो, हे आज सकाळी जोरदार पावसातही झालेल्या आपल्या उपस्थितीवरून स्पष्ट दिसून येते. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून आपण स्वातंत्र्याचा उत्सव गौरवाने साजरा करत असतो, याचे आजच्या प्रसंगातून उत्तम उदाहरण मिळाले, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर,  सन्‍माननीय अतिथी श्रीमती जयश्री मिश्रा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख आदींची उपस्थिती होती. तसेच सर्व  विभाग प्रमुख प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले.