Thursday, August 14, 2025

मराठवाड्यात ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रम उत्साहात

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ४०० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद....


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ११ चमूमधील ३२ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४०० हून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शेतीविषयक समस्यांना समाधानकारक उत्तरे दिली.

जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा येथे झालेल्या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी शाश्वत शेतीसाठी खर्चात बचत करण्यावर भर देत विद्यापीठाने शिफारस केलेले तंत्रज्ञानच अवलंबण्याचे आवाहन केले. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या उपयुक्त कार्यक्रमाची माहिती देऊन शेतकऱ्यांना सहभागासाठी प्रोत्साहित केले.

यावेळी विस्तार कृषि विद्यावेत्ता व कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग तसेच हळद व कापूस पिकातील खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कीटकशास्त्रज्ञ श्री. मधुकर मांडगे यांनी सोयाबीन, कापूस व हळद पिकात येणाऱ्या हुमणी किडीवर नियंत्रणासाठी मेटारायझियम बुरशीचे एकरी ४ किलो/४ लिटर आळवणी करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाला तालुका कृषि अधिकारी श्री. नितीन घुगे, मंडळ कृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या उपक्रमात विद्यापीठाच्या विविध संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. धाराशिवचे कृषि महाविद्यालय, परभणीचे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, नांदेडचे कापूस संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी), कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, खामगाव, तुळजापूर, बदनापूर) तसेच लातूरचे कृषि महाविद्यालय, गळीत धान्य संशोधन केंद्र या कार्यालयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उपक्रमात डॉ. दिगंबर पेरके, डॉ. सुर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. काकासाहेब चव्हाण, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भवर, डॉ. तुकेश सुरपाम, प्रा. किशोर जगताप, डॉ. सचिन धांडगे यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी श्री. दशरथ पवार, श्रीमती कस्तुरे, श्री. रामेश्वर ठोंबरे, श्री. किशोर शेरे व श्री. अस्सलकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळून तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी गती मिळाली असून, मराठवाडा कृषी क्षेत्राला शाश्वत विकासाचा नवा मार्ग मिळत असल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले.