कृषि यांत्रिकीकरण, मृद व जलसंधारण, उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी
कार्यक्षम वापर, कृषि मालाची प्रक्रिया व मूल्यवर्धन,
नियंत्रित व काटेकोर शेती पद्धती, अपारंपरिक
ऊर्जा स्त्रोतांचा वापर तसेच ड्रोन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान विकास व अवलंब या
सर्व बाबींमध्ये कृषि अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले.
कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे आयोजित “कृषि अभियांत्रिकीतील
उद्योगाच्या संधी” या कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके,
इंजी. भालचंद्र पेडगावकर, इंजी. वैभव आजेगावकर
आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या
भाषणात सांगितले की, वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविणे हे आगामी
काळात मोठे आव्हान ठरणार आहे. प्रति व्यक्ती धारणा कमी होत असल्यामुळे, उपलब्ध माती व पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेतीची उत्पादकता वाढविणे
आवश्यक आहे. कृषि विकासात कृषि अभियांत्रिकी पदवीधरांची भूमिका अत्यंत मोलाची
ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. राहूल
रामटेके यांनी केले. त्यांनी सांगितले की, बी.टेक.
(कृषि अभियांत्रिकी) पदवीधरांना शासकीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खासगी
कंपन्यांमध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच अनेक पदवीधरांनी स्वतःचा
उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे आणि डॉ. अनिकेत वाईकर यांनी
करून दिला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात इंजी. भालचंद्र
पेडगावकर यांनी सांगितले की, कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना
सिंचन कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. तसेच अनुभवाच्या आधारे
स्वतःचा उद्योग उभारण्याचीही संधी मोठ्या प्रमाणात आहे.
इंजी. वैभव आजेगावकर यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी
सांगितले की, शिक्षण घेत असताना ध्येय ठरवून सातत्यपूर्ण परिश्रम
केल्यास हमखास यश मिळते. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, कृषि
अभियांत्रिकी पदवीधरांना ट्रॅक्टर कंपन्या, सिंचन साधन
निर्मिती, सौर ऊर्जा उपकरणे, कृषि
प्रक्रिया उद्योग, हरितगृह उभारणी तसेच मृद व जलसंधारणाच्या
कामांमध्ये रोजगार व उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद
भोसले, डॉ. मदन पेंडके, डॉ. सुमंत जाधव,
डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील,
डॉ. शैलजा देशवेना, श्री. अशोक अण्णा देशवेना
तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी
केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुभाष विखे यांनी केले. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी श्री. प्रमोद राठोड, विद्यार्थी समर्थ
असुटकर, वरद विनोरकर, राध्येशाम खटींग,
सतेज मेटकर इत्यादींनी परिश्रम घेतले.