Tuesday, August 19, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या बायोमिक्स प्रकल्पातून तीन टन बायोमिक्सची खरेदी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बायोमिक्स प्रकल्पातून दिनांक १९ ऑगस्ट रोजी कृषी प्रधान ऑर्गानिक कंपनी तर्फे तीन टन बायोमिक्सची (पावडर स्वरुपात) खरेदी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, विद्यापीठात तयार होणाऱ्या जैविक निविष्ठांचा वापर थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहे, हे समाधानकारक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये बायोमिक्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम दिसून येत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.

माननीय कुलगुरूंनी प्रगतिशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांच्या शेतातील यशोगाथा नोंदवून ठेवण्याचे निर्देश दिले तसेच त्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली. त्यांनी हळद लागवडीदरम्यान प्रति एकर पाच किलो बायोमिक्सचा केलेला वापर आणि त्यातून मिळालेले उत्तम निकाल यांचे विशेष कौतुक केले. तसेच माननीय कुलगुरूंनी सांगितले की, बायोमिक्स जमिनीतील विरोधी बुरशींचे प्रमाण कमी करून पिकांच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक घटक पुरवते. त्यामुळे मुळकुज आणि कंदकुज टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रति एकरी चार किलो बायोमिक्स ड्रिपद्वारे वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी बायोमिक्स प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी माहिती दिली की, आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी विविध पिकांवर बायोमिक्सचा वापर करून यशस्वी प्रयोग केले असून उत्कृष्ट निकाल मिळवले आहेत. बायोमिक्स अतिशय अल्प दरात कापूस संशोधन केंद्र व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सहज उपलब्ध आहे.

प्रगतिशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांनी आपला अनुभव सांगताना हळद पिकामध्ये ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे बायोमिक्सचा वापर केल्यास हळदीचा रंग अधिक पोपटी होतो तसेच उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होते, असे नमूद केले. त्यांनी २०२१ पासून हा अनुभव घेत असून सातत्याने उत्कृष्ट परिणाम मिळत असल्याचे सांगितले.

या वेळी श्री. उद्धव जामगे, प्रगतिशील शेतकरी ज्ञानोबा येवले, रत्नाकर ढगे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.