Sunday, August 31, 2025

मुग, उडीद आणि तूर पिकाची काळजी घेण्यासाठी वनामकृवि शास्त्रज्ञांचा सल्ला

 

सध्या स्थितित सतत पडणारा पाऊस यामुळे मुग, उडीद आणि तूर पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजमितीस मुग आणि उडीद हि पिके काढणी अवस्थेत तर तूर शाखीय व गुंड्या लागण्याच्या अवस्थेत आहेत. सतत पडणारा पाऊस यामुळे आणि जमीनितील ओलावा यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील  कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांनी पुढील प्रमाणे उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

मुग आणि उडीद

पिकाची काढणी सुरु आहे तेंव्हा शेंगा ओल्या राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. शेंगा ओल्या असतील तर त्या शेड मध्ये सुकविणे अत्यंत गरजेचे आहे.

तूर

तूर पिकात जास्तीच्या पावसाने  पाणी साचले असल्यास निचरा करावा. या करिता उताराच्या दिशेने चर काढावे.

पूर्ण पाण्याचा निचरा झाल्यानंतर १९:१९:१९ या विद्राव्य खताची (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ) फवारणी करावी.

अतिवृष्टी जास्तीचा पाउस यामुळे जमीन खरडली गेली असल्यास तुरीला मातीची भर द्यावी.

बुरशीची लागण होऊ नये म्हणून एकरी ४ किलो बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्माची आळवणी करणे गरजेचे आहे.

किंवा

कॉपर ऑक्सिक्‍लोराईड २५ ग्रॅम आणि युरिया २०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

शक्य असल्यास पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी व इतर किडींसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ %  निंबोळी अर्काची फावरणी घ्यावी.