फळपिकांच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास उत्पादनात
हमखास वाढ होत असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर
येथील फळ संशोधन केंद्र (हिमायतबाग) येथे दिनांक १६ ऑगस्ट रोजी एकात्मिक फलोत्पादन
विकास अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी
अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी, विद्यापीठ
कार्यकारी परिषद सदस्य श्री. दिलीप देशमुख, संचालक संशोधन
डॉ. खिजर बेग, विभागीय कृषी सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख
तसेच फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित
होते.
पुढे बोलताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, “शेतकरी देवो
भव:” या भावनेतून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. शेतकरी
हिताला विद्यापीठात सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी आपल्या मनोगतामध्ये तंत्रज्ञान ही एक मोठी
शक्ती असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळेच देश अन्नधान्याच्या
बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात या केंद्रामार्फत ‘राजकेसर’ नावाचा दर्जेदार आंबा वाण विकसित
करण्यात येणार असल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी दिली. तसेच
शेतकरीभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियमित आयोजन फळ संशोधन केंद्रामार्फत
करण्यात येईल, असे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास मराठवाड्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. यावेळी माननीय कुलगुरूंच्या हस्ते डॉ. संजय पाटील यांचा
शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय बागायती मंडळातर्फे केंद्राच्या रोपवाटिकेस
प्राप्त ‘टू स्टार’ दर्जाबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात ‘आंबा किड व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. बस्वराज भेदे
यांनी तर ‘आंबा रोग व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. प्रफुल्ल घंटे यांनी मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय सावंत यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. रवींद्र
नैनवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सदाशिव अडकिने, गिरीश सोनवणे, प्रशांत सुरडकर, अनिल बकले, मोहम्मद इसाक आदींनी परिश्रम घेतले.