Tuesday, August 19, 2025

वनामकृवि येथे आंतरमहाविद्यालयीन युवक व क्रीडा महोत्सवाचे भव्य उद्घाटन

 कला आणि क्रीडा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव तसेच क्रीडा महोत्सवाचे भव्य उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ ऑगस्ट  रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील दीक्षांत सभागृहात पार पडले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने विद्यापीठ परिसरात उत्साहाचे आणि सांस्कृतिक उर्जेचे वातावरण निर्माण झाले.

उद्घाटन प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कला आणि क्रीडा या दोन्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. अशा महोत्सवांमधून विद्यार्थ्यांची प्रतिभा फुलते आणि त्यांना आत्मविश्वास, सर्जनशीलता व नेतृत्वगुणांची प्रेरणा मिळते.

युवक महोत्सवाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या फाइन आर्ट्स” या कला प्रकारातील स्पर्धा दिनांक १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमधील ३० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कृषि महाविद्यालय, परभणी, लातूर, आष्टी (के. एस. के. बीड), कांचनवाडी, अन्न तंत्र महाविद्यालय परभणी, राजीव गांधी अन्न तंत्र महाविद्यालय परभणी, पी. जी. आय. ए. बी. एम. चाकूर तसेच इतर संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रतिम कलाविष्काराचे मनोहारी सादरीकरण केले.

एकूण सहा कला प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये पोस्टर पेंटिंग, ऑन द स्पॉट पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, रांगोळी आणि कार्टूनिंग यांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता, कल्पनाशक्ती आणि रंगांची जादू साकारून परीक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे यांनी मोलाचे सहकार्य केले, तर विद्यापीठाच्या फाइन आर्ट्स प्रभारी श्री. अमोल सोनकांबळे यांनी सर्व स्पर्धांचे प्रभावी समन्वयन केले.

या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धेतच नव्हे, तर परस्पर संवादातून, नवीन कल्पनांची देवाणघेवाण करून, कला, क्रीडा आणि संस्कृती यांचे अद्वितीय मिश्रण अनुभवले.