Wednesday, August 13, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ५३ वी क्रीडा मंडळ बैठक उत्साहात पार

 खेळ, अभ्यास आणि आरोग्य हेच यशस्वी जीवनाचे मंत्र – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने ५३ वी क्रीडा मंडळ बैठक दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, प्रभारी नियंत्रक श्री. सुधाकर सोळंके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. खेळासाठी कोणतीही सीमा किंवा बंधने नसतात. खेळामुळे मानसिक संतुलन राखले जाते, परस्परांप्रती आदर, आपुलकी व मदतीची भावना विकसित होते, तसेच सांघिक कार्याची वृत्ती बळकट होते.  जीवनात अनेकदा नैराश्याचे प्रसंग येतात; त्यावरचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ‘खेळ’. खेळातून वैमनस्य दूर होते व मैत्रीची भावना दृढ होते. त्यामुळे खेळ जीवनाचा अविभाज्य घटक बनवणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी जीवनासाठी खेळ, अभ्यास आणि आराम ही तीन तत्त्वे अंगीकारावीत. शिक्षणाने माणूस विद्वान होतो, तर खेळाने तो महान बनतो, असे सांगून त्यांनी सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल यांसारख्या महान खेळाडूंची उदाहरणे दिली व खेळातून चमत्कार घडतो, असे नमूद केले.

शारीरिक व रोग व्यवस्थापनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, योग्य शारीरिक व्यवस्थापन केल्यास रोग व्यवस्थापनाची गरज भासत नाही. यासाठी त्यांनी स्वतःचा नित्यक्रम सांगितला, ते दररोज ३० मिनिटे वेगाने चालतात, ३० मिनिटे व्यायाम करतात आणि ३० मिनिटे योगाभ्यास करतात. त्यामुळे त्यांना आजारी पडल्याचे आठवत नाही.

मराठवाडा व महाराष्ट्रात खेळासाठी उत्कृष्ट वातावरण असून, अनेक महान खेळाडूंनी येथे विशेष प्राविण्य मिळवले आहे. परभणीतूनही अशाच दर्जेदार खेळाडू घडावेत, यासाठी विद्यापीठाच्या वतीने पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ परभणी जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील उच्च दर्जाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवत असून, त्यांची प्रशंसा देशभर होत आहे. यामुळे परभणी जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर पोहोचत आहे. तसेच विद्यापीठाने संशोधन, शैक्षणिक व विस्तार कार्यात लक्षणीय प्रगती साधली असून भौतिक सुविधांची वाढ व सुधारणा केली आहे. अनेक वर्षे पडीत असलेली अडीच हजाराहून अधिक एकर जमीन पुनर्वापरात आणून बीज उत्पादनात वाढ केली, ज्यामुळे परिसरातील २०० हून अधिक मजुरांना तात्पुरता पण नियमित रोजगार मिळाला. याशिवाय, विद्यापीठास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या वतीने उच्चांकी गुणांकनासह "अ" दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे या विद्यापीठाचा घटक असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे त्यांनी आवाहन केले.

महाराष्ट्र हे कृषि व औद्योगिक क्षेत्रात प्रगत राज्य असून, राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. खेळाच्या माध्यमातूनही असेच विक्रम महाराष्ट्रातून घडावेत, यासाठी विद्यापीठातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, सर्व महाविद्यालयांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, खेळासाठी भौतिक सुविधा, मैदाने व सभागृहे वाढवावीत, असे त्यांनी सुचवले.

शेवटी, त्यांनी सदाचार व सद्विचार वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले आणि अनमोल मानवी जीवन हे मानवकल्याणासाठी समर्पित करावे, असे महत्त्वपूर्ण उद्गार काढले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मागील वर्षी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. येत्या वर्षात होऊ घातलेल्या ‘अविष्कार’ स्पर्धेसाठी सर्व महाविद्यालयांनी व विभागांनी उत्कृष्ट तयारी करून विद्यापीठासाठी जास्तीत जास्त पुरस्कार मिळवावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खेळाचे महत्त्व सांगताना, चांगल्या सवयी लागण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, माननीय राज्यपाल महोदयांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सर्व संकल्पना यशस्वीपणे राबवायच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी सांगितले की, विद्यापीठात सिंथेटिक ट्रॅक स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याने, मागील तीन वर्षांत सर्व महाविद्यालयांनी मिळवलेली यशे आणि प्राविण्य यांची माहिती सादर करावी. याद्वारे माननीय क्रीडामंत्र्यांसमोर विद्यापीठाचे प्रभावी सादरीकरण करून, विद्यापीठात सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी विद्यापीठातून दर्जेदार खेळाडू घडावेत, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे नमूद केले. त्यांनी मागील आयोजित स्पर्धा, त्यामधील विद्यापीठाचा सहभाग व मिळवलेली प्राविण्ये याची माहिती दिली. तसेच २०२५ -२६ या वर्षातील विद्यापीठाच्या खेळांविषयीच्या नियोजनाची माहिती मांडली. यामध्ये, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली, या शैक्षणिक वर्षी विद्यापीठात ‘अविष्कार’ स्पर्धेचे आयोजन जानेवारी महिन्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत लोणारे येथील अविष्कार संशोधन महोत्सवात प्रथम पुरस्कार प्राप्त अन्न तंत्र महाविद्यालयाचा विद्यार्थी संग्राम वाडेकर, बडोदा येथील विद्यापीठ वुडबॉल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रीधर वाघ आणि आयोध्या येथील कृषि विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या प्रकारात कास्यपदक प्राप्त कृषि महाविद्यालय, गोळेगावचा विद्यार्थी ओम पोले यांना मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या वतीने रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

बैठकीस विद्यापीठातील सर्व घटक व संलग्न कृषि महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य, जिमखाना उपाध्यक्ष, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले.