Sunday, August 31, 2025

अतिवृष्टी परिस्थितीमध्ये कापूस पिकाचे व्यवस्थापन; वनामकृविच्या शास्त्रज्ञांनी सुचविल्या उपाययोजना

 

मराठवाडा विभागामध्ये ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सततचा पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे कमी – अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे पहायला मिळत आहे. यासोबतच मागील दोन-तीन दिवसांपासून नांदेड, बीड, जालना, छ. संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर  जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी तसेच काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाल्यामुळे कापूस पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये सततच्या पावसाचा पिकावर होणारा परिणाम व पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे सहयोगी कृषिविद्यावेत्ता तथा कापूस पिक तज्ज्ञ   डॉ अरविंद द. पांडागळे यांनी पुढील प्रमाणे उपाययोजना सुचविल्या आहेत.

सततच्या पावसाचा कपाशीवर होणारा परिणाम

सततचा पाऊस व अतिवृष्टीनंतर जर शेतातून पाण्याचा योग्य निचरा लवकर झाला नाही तर कापूस पिकावर अनिष्ट परिणाम होतो. कापसाच्या वाढीसाठी पुरेशा ओलाव्याची गरज असली तरी, जास्त पावसामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कापूस पिकाची वाढ व उत्पादनावर परिणाम होतो.

अतिवृष्टीचा कापसावर होणारे प्रमुख परिणाम

चिबड जमीन आणि पिकाचे आरोग्य

ऑक्सिजनचा अभाव: कापूस पिकामध्ये चिबड परिस्थितीत तग धरण्याची नैसर्गिक क्षमता नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून सततचा पाऊस व पूर परिस्थिती हे कापसाच्या झाडास नुकसान होण्याचे मुख्य कारण आहे. मातीतील हवेची जागा अतिरिक्त पाणी घेते, ज्यामुळे मुळांच्या भागामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामुळे मुळांची वाढ, पोषक तत्वांचे शोषण आणि झाडाचे एकूण कार्य बिघडते.

पोषक तत्वांच्या समस्या: पाणी साचल्यामुळे जमिनीच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक पोषक तत्वे कापसाच्या झाडासाठी उपलब्ध होऊ  शकत नाहीत. यामुळे रोपट्याची पाने पिवळी पडणे आणि कोमेजणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. सद्यस्थितीमध्ये कापूस हे पीक पाते लागणे ते बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे दिलेल्या खतांपैकी नत्र हे अन्नद्रव्य निचऱ्याद्वारे शेताबाहेर वाहून जाऊ शकते. त्यामुळे पिकाची पाने पिवळी पडत असल्याचे दिसत आहे. तसेच उशीराने लागवड झालेल्या भागामध्ये नत्राचा दुसरा हप्ता देण्यास सततच्या पावसामुळे व वाफसा नसल्यामुळे विलंब झाला आहे. नत्राच्या कमतरतेमुळे अन्य अन्नद्रव्यांचे शोषण होण्यास अडथळा येतो. शारिरीक ताण: झाडांच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठी प्रकाशसंश्लेषण आणि बाष्पोत्सर्जन या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. पाणी साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या ताणामुळे कापूस झाडांच्या प्रकाशसंश्लेषण आणि बाष्पोत्सर्जन क्रियांमध्ये घट होऊ शकते. यामुळे कपाशीमध्ये आकस्मिक मर या विकृतीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.  यामध्ये पाऊस थांबल्यानंतर जेव्हा तापमान व आर्द्रता वाढते तेव्हा झाडांची पाने मान टाकल्यासारखी दिसतात. याची लक्षणे अचानक दिसायला लागतात व दुपारनंतर अशी लक्षणे दिसणाऱ्या झाडांच्या संख्येत वाढ होते. अशा परिस्थितीमध्ये आवश्यक मात्रेमध्ये अन्न व पाणी शोषण होऊ शकत नाही. तसेच या परिस्थितीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता दाट असते.  त्यामुळे वेळेवर व्यवस्थापन करणे अगत्याचे आहे. बऱ्याच भागामध्ये वाफसा न आल्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्यासही अडथळा येऊ शकतो.

रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता

अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण होणारी जास्त आर्द्रता बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांच्या प्रसारासाठी योग्य वातावरण निर्माण करते. दीर्घकाळ ओल्या परिस्थितीत कापूस पिकावर सामान्यतः आढळणाऱ्या खालील रोगांचा समावेश होतो:

पानावरील करपा : हा जीवाणूजन्य रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. याची सुरुवात पानांवर प्रथम लालसर आणि नंतर काळे ठिपके पडण्याने होते, ज्यामुळे पाने सुकतात आणि गळून पडतात.

मर रोग (Wilt): बुरशीमुळे होणारा मर रोग कापसासाठी अत्यंत विनाशकारी आहे. हा रोग झाडाच्या मुळांवर परिणाम करतो. यात मुळांच्या रसवाहिनीमध्ये रोगकारक बुरशीची वाढ होते. बुरशीची वाढ झाल्यामुळे मुळे पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेऊ शकत नाहीत, परिणामी झाडाचा मृत्यू होतो. अशाप्रकारे प्रादुर्भाव करणारी बुरशीचा प्रसार मातीद्वारे होत असल्यामुळे विशिष्ट भागामध्ये लक्षणे प्रथम दिसतात व त्यापासून पुढे त्याचा प्रसार वेगाने होतो.

बोंड सडणे : बुरशी आणि जिवाणूंच्या संक्रमणामुळे हा रोग होतो. रोगकारक जीवाणू व बुरशी खराब झालेल्या बोंडांमधून आत प्रवेश करतात. संक्रमित बोंडे कुजतात, त्यांची वाढ थांबते आणि धागे तसेच बियांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटते.

दहिया : ओलसर व दमट हवामान आणि अधून मधून पडणारा पाऊस असल्यास पानावर दही शिंपडल्यासारखे बुरशीचे पांढरे चट्टे दिसतात. याची सुरुवात पानाच्या खालच्या बाजूने होते. सद्यस्थितीमध्ये सातत्याचा पाऊस व दमट हवामान असल्यामुळे दहिया रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन :

आकस्मिक मर :

पाण्याचा निचरा करावा: अतिवृष्टि झालेल्या भागातील जमिनीवर साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे.

आळवणी : कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम) + युरिया (२०० ग्रॅम) + पांढरा पोटॅश (१०० ग्रॅम) प्रति १० लिटर पाणी  या प्रमाणात द्रावण करून प्रति झाडास १०० मिलि द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी (ड्रेंचींग) करावी. किंवा           

फवारणी : विकृतीची लक्षणे दिसू लागताच काही तासांत कोबाल्ट क्लोराईड १० पीपीएम (१ ग्रॅम प्रति १०० लि. पाणी) ची फवारणी द्यावी.

खोडाजवाळील माती दाबणे: पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास झुकलेली झाडे मातीचा भर देऊन सरळ करावीत. कपाशीच्या झाडांचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास दोन पायाच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.

जमिनीतील हवा खेळती ठेवणे : शेतजमीन वाफश्यावर आल्यानंतर हलकी आंतरमशागत करून कापसाच्या मुळांना हवा खेळती ठेवावी म्हणजे झाडे लवकर पूर्ववत होतील.

वरील सर्व उपाययोजना कापसाच्या शेतामध्ये झाडे मर होत असलेली दिसताच त्वरीत (२४ ते ४८  तासाच्या आत) कराव्यात. जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. व्यवस्थापनास जेवढा उशीर होईल तेवढा फायदेशीर परिणाम कमी होईल.

 

अन्नद्रव्यांचा निचरा / कापूस पिवळा पडणे :

नत्राचा दुसरा हप्ता द्यावयाचा शिल्लक असल्यास वाफसा येताच द्यावा.

पिकाची सद्यस्थितील अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी पुढीलप्रमाणे विद्राव्य खतांची फवारणी करावी.

अ.क्र.

विद्राव्य खत

फवारणीची अवस्था

प्रमाण प्रति १० लि. पाणी

१.

डी ए पी

पाते लागणे ते फुले लागणे (४५-६० दिवस)

२०० ग्रॅम

२.

१९:१९:१९

७५-८० दिवस

१०० ग्रॅम

३.

१३:००:४५

८५-९० दिवस

२०० ग्रॅम

रोगांचे व्यवस्थापन :

बुरशीजन्य मर :

मर रोगाची लागण झाली काय हे पाहण्यासाठी रोगकारक परिस्थितीमध्ये शेतामध्ये बारकाईने निरिक्षण करणे आवश्यक आहे. त्वरित उपाययोजना न केल्यास हा रोग त्वरित पसरतो. बुरशीचा प्रसार मातीद्वारे होत असल्यामुळे उपाययोजना मातीलाच करावी लागते, फवारणी करून उपयोग होत नाही. बुरशीजन्य मर रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्वरीत पुढीलप्रमाणे एकाची आळवणी (ड्रेंचींग) करावी.

 

जैविक ट्रायकोडर्मा घटक १०० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा

कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू.पी.) २५  ग्रॅम + युरिया २०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आळवणी (ड्रेंचींग) करावी किंवा

कार्बेन्डाझिम (५०% डब्लू.पी.)  १० ग्रॅम + युरिया २०० ग्रॅम प्रति १० लि. पाणी

जीवाणूजन्य करपा :

केवळ प्रादुर्भाव झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनापेक्षा लागवडीपासून बीजप्रक्रिया, पीक फेरपालट, पालाशयुक्त खतांचा सुयोग्य वापर, आंतरमशागत व निचरा सुधारणे, इत्यादी बाबी सुरुवातीपासून केल्यास करपा रोगाच्या प्रादुर्भाव व प्रसाराचे प्रमाण कमी होते. लक्षणे दिसल्यानंतर स्ट्रेप्टोसायक्लीन ०.४ ग्रॅम + कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी.

बोंडसड : बोंडसड अंतर्गत व बाह्य यापैकी असू शकते. अंतर्गत बोंडसड असल्यास बाहेरून स्पष्ट लक्षात येत नाही. त्याकरिता आठवड्याला काही बोंडे फोडून पहावी. आणि बोंडसडच्या प्रकारानुसार खालील प्रकारे प्रति १० लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी.

आंतरिक बोंडसड : कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) - २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन ०.४  ग्रॅम

बाह्य बोंडसड : पायराक्लोस्ट्रोबीन (२०% डब्ल्यूजी) - १०  ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) + पायराक्लोस्ट्रोबीन (५% डब्ल्यूजी) - २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ईसी) - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२%) + डायफेनोकोनॅझोल (११.४% एससी) (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्ल्यूपी) - २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी

दहिया :

नत्राचा अतिरेकी वापर टाळावा. प्रादुर्भाव आढळून आल्यावर खालील पैकी एकाची प्रति १० लिटर पाणी प्रमाणात फवारणी घ्यावी.

कार्बेन्डेझीम + मॅन्कोझेब (६३% डब्ल्यूपी) @ ३० ग्रॅम

अझोक्सीस्ट्रोबीन (१८.२%) + डायफेनकोनाझोल (११.४ एससी) @ १० मिली किंवा

क्रेसोक्झीम मिथाईल (४४.३% एससी) @ १० मिली

येत्या काळात दमट हवामान व पावसाचा अंदाज आणि वरील प्रमाणे आपल्या शेतजमिनीची  व पिकाची परिस्थिती पाहून पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन केल्यास कापूस पिकाचे नुकसान टाळता येईल.

चिबड जमीन : कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम + युरिया २०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आळवणी (ड्रेंचींग) करावी. नत्राचा निचरा झाल्यास फवारणीद्वारे नत्रयुक्त खतांचा वापर करावा.

सर्वसाधारण जमिनी : जैविक ट्रायकोडर्मा घटक100 ग्राम प्रति 10 लिटर आळवणी करावी.

वरीलप्रमाणे आळवणीनंतर एक आठवड्याने कार्बेन्डेझीम + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी @ ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी प्रमाणात  फवारणी घ्यावी. ज्या जमिनीमध्ये वाफसा नसल्यामुळे फवारणीस उशीर होत असल्यास उपलब्धतेनुसार ड्रोनद्वारे फवारणी करावी.