Tuesday, August 12, 2025

‘शेतकरी देवो भवः’ मालिकेत यशस्वी महिला उद्योजिका सौ. छाया शिंदे यांची प्रेरणादायी मुलाखत

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सौ. छाया शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भवः’ या नाविन्यपूर्ण ऑनलाईन मालिकेमध्ये दिनांक १२ ऑगस्ट रोजी  कृषि आधारीत प्रक्रिया उद्योग या विषयी ताडकळस (ता.पूर्णा जि.परभणी) येथील जयंत गृह उद्योगाच्या सौ. छाया शिंदे यांची यशस्वी महिला कृषि उद्योजिका म्हणून मुलाखत घेण्यात आली. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. विद्यापीठाच्या स्टुडिओत ही मुलाखत वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. मीनाक्षी पाटील यांनी घेतली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सौ. छाया शिंदे यांचे एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, महिला उद्योजकांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या कौशल्यविकासासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा आपला दृढ मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सौ. छाया शिंदे यांनी 'जयंत डाळमिल व पापड उद्योग' नावाने एक छोटा व्यसाय ताडकळस ता.पूर्णा जि. परभणी येथे सुरू केला. तूर, मूग, उडीद, हरभरा या सर्व प्रकारच्या डाळी तसेच विविध १५ प्रकारच्या पापडी बनवून ग्राहकापर्यंत घराघरात पोहोचवल्या. त्यांनी या मुलाखती दरम्यान आपल्या उद्योग उभारणीचा खडतर प्रवास सांगितला. दरम्यान येणाऱ्या अडचणी, येणारे अनुभव तसेच मिळालेला प्रतिसाद याबद्दल सविस्तर मांडणी केली. उद्योग क्षेत्रात नव्याने आलेल्या महिलांनाही अनमोल माहिती दिली. तसेच 'महिलांनी कृषीवर आधारित उद्योग व्यवसायात झेप घेऊन स्वतःला सिद्ध करावे!' असे आवाहनही केले. यावेळी उपस्थित प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.