रावे कार्यक्रमाचा केला प्रारंभ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाची
अंमलबजावणी यावर्षी मौजे इंदेवाडी (ता. व जि. परभणी) येथे करण्यात आली आहे. या
कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना ‘ग्रामकन्या’ आणि ‘ग्रामदूत’ म्हणून नामनिर्देशित
करण्यात आले असून ते सर्व आज, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मौजे
इंडेवाडी येथे दाखल झाले आहेत.
हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार आहे.
गावात दाखल होताच ग्रामकन्या व ग्रामदूत यांनी रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर
पुरी यांच्या उपस्थितीत सरपंच श्री अशोक कच्छवे, ग्रामसेवक श्री हनुमान कच्छवे,
कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी श्री संजयअण्णा सिसोदिया यांच्यासोबत
ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मदतनीस श्री माधव कच्छवे, ग्रामस्थ श्री विष्णू कच्छवे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ. शंकर पुरी यांनी या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट करताना
सांगितले की, विद्यार्थिनींना ग्रामीण समाजाशी जोडणे, शेतकरी
कुटुंबात राहून त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची जाण करून घेणे तसेच
शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हे या उपक्रमामागचे प्रमुख ध्येय आहे.
याबरोबरच विद्यार्थ्यांना गावातील कुटुंबांमध्ये राहण्याची संधी मिळणार असून
त्यातून त्यांचे निरीक्षण, अनुभव व प्रशिक्षण अधिक
परिणामकारक होणार आहे. या कुटुंबांनाही शास्त्रोक्त बालसंगोपन, संतुलित आहार व पोषण, दैनंदिन कामे करत असताना
होणारे काबाडकष्ट कमी करण्याची तंत्रे, बालकांच्या सर्वांगीण
विकासासाठी विविध उपक्रम आदी विषयांवर हे
विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात एकूण १० आठवड्यांसाठी
सुरू राहणार असल्याची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. तसेच रावे कार्यक्रमातील
विविध उपक्रमांविषयी ग्रामस्थांना जागरूक करून ग्रामकन्या व ग्रामदूतांना सहकार्य
करण्याचे आवाहन केले.
यानंतर सरपंच श्री अशोक कच्छवे व ग्रामसेवक श्री हनुमान कच्छवे यांनी
विद्यार्थिनींना संपूर्ण कार्यक्रमात सहकार्य व आपुलकीचा भाव देण्याची ग्वाही
दिली. कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी श्री संजयअण्णा सिसोदिया यांनी सर्व चमूला
त्यांच्या घरी नेऊन आदरातिथ्य केले. उपसरपंच श्रीमती मीरा चंदेल यांनीही या
उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे
यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अन्न
विज्ञान व पोषण विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, साधन संपत्ती व्यवस्थापन व ग्राहक विज्ञान
विभाग प्रमुख तसेच मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका
डॉ. निता गायकवाड, वस्त्र व परिधान अभिकल्पना विभाग प्रमुख
डॉ. वीणा भालेराव आणि सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.
शंकर जी. पुरी यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा उपक्रम
अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक
बांधिलकीही मजबूत होईल, असा विश्वास रावे आयोजकांनी व्यक्त केला आहे.