Friday, August 15, 2025

“शेतकरी–शास्त्रज्ञ कृषि संवाद” या ऑनलाईन कार्यक्रमाचा ५९ वा भाग यशस्वीरित्या संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, कीटकशास्त्र विभाग व क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत आयोजित “शेतकरी–शास्त्रज्ञ कृषि संवाद” या ऑनलाईन कार्यक्रमाचा ५९ वा भाग दिनांक १५ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सद्यस्थितीत खरीप पिकांतील कीड व रोग व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन या भागात करण्यात आले.

यावेळी वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एच. घंटे यांनी रोगांची ओळख व नियंत्रण उपाय सांगितले. तर कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. बस्वराज भेदे यांनी सोयाबीन पिकांचे संरक्षण करताना अनावश्यक कीटकनाशकांचा वापर टाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कीड नियंत्रणासाठी होणारी अव्यवस्थित स्पर्धा टाळावी, तसेच पहिली व दुसरी फवारणी जैविक कीटकनाशकांनी करण्याचा सल्ला दिला.

शास्त्रज्ञांनी सद्यस्थितीत हवामान बदलानुसार घ्यावयाची खरीप पिके, फळपिके व पशुधन व्यवस्थापनाविषयीही शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खरीप पिके तसेच फळबागांविषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कापसे यांनी शेतकऱ्यांना सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.