तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणे म्हत्वाचे... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
हाडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील ७५ वर्षीय पवार दांपत्याची व्यथा काही
दिवसांपूर्वी वर्तमानपत्रे व दूरदर्शन वाहिन्यांमधून व्यापक प्रसिद्ध झाली होती.
बैलजोडी व शेती अवजारे नसल्याने श्री. अंबादास पवार यांची पत्नीच स्वतः शेतात
सोयाबीन व कापूस पिकामध्ये कोळपणी आणि अंतर मशागत करत असल्याचे समोर आले होते.
या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच प्रकल्प समन्वयक डॉ. एस. पी. सिंग यांच्या
मार्गदर्शनाखाली, विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - पशुसंवर्धनाचे
यांत्रिकीकरण या योजनेचे प्रमुख डॉ. दयानंद टेकाळे (संशोधन अभियंता), डॉ. संदेश देशमुख (पशुशास्त्रज्ञ) आणि इंजी. अजय वाघमारे (वरिष्ठ तांत्रिक
सहाय्यक) यांनी शेतकरी श्री. अंबादास पवार यांच्या शेताला नुकतीच भेट देऊन
त्यांच्या समस्यांची पाहणी केली.
श्री. पवार यांच्या साडेचार एकर शेतीची माहिती घेतल्यानंतर, विद्यापीठामार्फत त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी पवार यांनी सध्या बैलजोडी असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यापीठाने त्यांना बैलचलित अवजारांचा संपूर्ण संच देण्याचे निश्चित केले. यामध्ये क्रीडा टोकण यंत्र, तीन पासांचे कोळपे, धसकटे गोळा करणारे अवजार, सरी पाडण्याचे अवजार तसेच सौरऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र यांचा समावेश आहे.
यानिमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांच्या
अडचणी समजून घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना दिलासा देणे म्हत्वाचे असून हीच
खरी विद्यापीठाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प समन्वयक डॉ. एस. पी. सिंग यांनी सांगितले की, ही अवजारे केवळ
पवार यांच्यापुरतीच मर्यादित न राहता गावातील इतर अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही उपयोगी
पडावीत यासाठी कस्टम हायरिंग सेंटर स्थापन करून शेतकऱ्यांच्या समूहाला ही
अवजारे वापरण्यास दिली जातील. यामुळे श्री. पवार यांना आर्थिक मदत तर मिळेलच,
शिवाय गावातील इतर शेतकऱ्यांनाही या अवजारांचा लाभ घेता येईल.
या भेटीदरम्यान हाडोळती गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि
त्यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.