आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) निमित्त आयोजित
करण्यात आलेल्या ५ कि.मी. वॉकॅथॉन कार्यक्रमाचा दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून
उत्साहात प्रारंभ करण्यात आला. आर्य वैश्य महिला महासभा, परभणी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी
नियमित चालणे व व्यायाम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “आजचे चालणे, उद्याचे चांगले आरोग्य” हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची
आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य, शिक्षण व स्वावलंबन या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून वॉकॅथॉनसारखे
उपक्रम सकारात्मक जीवनशैली घडविण्यास मदत करतात, असे मत
त्यांनी व्यक्त केले.
या वॉकॅथॉनमध्ये शहरातील विविध क्षेत्रांतील महिला, युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सर्व सहभागी
महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, महिलांमध्ये
एकोपा वाढावा तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती सदस्य डॉ.
अर्चना डमढेरे, श्रीमती वैष्णवी वट्टमवार, श्रीमती संपदा वट्टमवार, श्रीमती सारिका वट्टमवार, स्वयंसेवक व सहभागी
महिलांचे माननीय कुलगुरूंनी अभिनंदन केले.
यावेळी विभाग प्रमुख डॉ.
हिराकांत काळपांडे, दंत चिकित्सक डॉ. पंकज
ढमढेरेयांची प्रमुख उपस्थिती होती. परभणीत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा
वॉकॅथॉन नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून आरोग्यदायी समाजनिर्मितीच्या दिशेने
एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

