Tuesday, March 17, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत कृषीसाठी वनस्पती मायक्रोबायोम तंत्रज्ञानावरील २१ दिवसीय प्रशिक्षणात व्याख्याने, प्रयोगशाळा प्रात्यक्षिके व प्रक्षेत्र भेटींवर भर

 

एकात्मिक शेती पद्धती योजना

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पासून उत्साहात सुरू आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड व महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सक्रिय सहभाग नोंदवत असून, वनस्पती मायक्रोबायोम, जैव-इनपुट्स तंत्रज्ञान, शाश्वत शेती व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषितंत्रज्ञान या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. व्याख्याने, प्रयोगशाळा प्रात्यक्षिके आणि प्रक्षेत्र भेटी यांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य सर्वांगीण विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक १५ मार्च २०२६ रोजी प्रशिक्षणार्थ्यांना विद्यापीठातील एकात्मिक शेती पद्धती योजनेस भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. लवलीन शुक्ला यांनी सखोल मार्गदर्शन करत ‘पुसा डी-कंपोजर’ या जैव-तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रयोगाची माहिती दिली. एकात्मिक शेती पद्धती योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव यांनीही प्रत्यक्ष दाखल्यांसह माहिती दिली.

प्रशिक्षणाच्या सतराव्या दिवशी, दिनांक १६ मार्च रोजी बायोमिक्स उत्पादन केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांना बायो-एजंट मल्टिप्लिकेशन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. बायोमिक्स केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी या तंत्रज्ञानाचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर करत जैव-इनपुट्स निर्मितीतील आधुनिक पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले.

तसेच दिनांक १७ मार्च २०२६ रोजी प्रशिक्षणार्थ्यांनी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास भेट दिली. या वेळी केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी येथे राबविण्यात येणाऱ्या विविध तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविली. यामध्ये शेततळे (Farm Pond) तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती (Intercropping Systems) तसेच पावसावर आधारित एकात्मिक शेती पद्धती (Rainfed Integrated Farming System - IFS) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक शेती पद्धती मॉडेलमधील फळपिके, शेळीपालन तसेच इतर पूरक व्यवसायांचे घटकही समजावून सांगण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (हवामानशास्त्र) अंतर्गत कार्यरत शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी वेधशाळेची कार्यप्रणाली स्पष्ट करत हवामानाधारित कृषी नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत व स्मार्ट शेतीसाठी हवामान माहिती कशी उपयुक्त ठरते, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या सर्व उपक्रमांमुळे प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक, शाश्वत व पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळत असून, त्यांच्या संशोधन व विस्तार कार्याला नवी दिशा मिळत आहे.

या सर्व भेटी दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.




बायोमिक्स उत्पादन केंद्र




कोरडवाहू शेती संशोधन केंद्र 






आखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (हवामान शास्त्र)