Friday, March 6, 2026

कृषि शिक्षणाबरोबर कौशल्य विकासालाही प्राधान्य द्या – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

बदलत्या काळात कृषि क्षेत्र झपाट्याने आधुनिक होत असून या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, तांत्रिक ज्ञान आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

माननीय कुलगुरूंनी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व लिहाखेडीच्या कृषि महाविद्यालयास भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी दिनांक ६ मार्च २०२६ रोजी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) व सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे, उपआयुक्त कौशल्य विकास श्रीमती विद्या शितोळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि विज्ञान केंद्राच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ  दीप्ती पाटगावकर आदी मान्यवरांची उपस्थित होती.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरूंनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अचूक शेती (प्रिसिजन फार्मिंग), जैविक शेती, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, डिजिटल कृषि आणि कृषि स्टार्टअप्स या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा उपयोग शेती आणि कृषि व्यवसायात करण्याची तयारी ठेवावी.

तसेच विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल्स विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभावी संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, संघभावना, नेतृत्वगुण आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता ही कौशल्ये विकसित केल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते आणि भविष्यातील करिअरसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते.

उपआयुक्त कौशल्य विकास विद्या शितोळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पदवी शिक्षणासोबतच कौशल्य विकासाशी संबंधित प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतात. विविध सरकारी व खासगी संस्थांमार्फत कृषि प्रक्रिया, अन्न प्रक्रिया उद्योग, मशरूम उत्पादन, मधमाशी पालन, शेती आधारित उद्योग आणि कृषि उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी कृषि क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

यादरम्यान माननीय कुलगुरूंनी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गहू बीजोत्पादन, ट्रायकोकार्ड निर्मिती प्रयोगशाळा तसेच ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रिया व त्याचा उपयोग याबाबत माहिती घेतली व कार्याचे कौतुक केले.

यावेळी कृषि महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्रीनाथ ज्ञानेश्वर चव्हाण याचा येसमिट संस्थेकडून उद्योजकतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थी अभय पालवे याने भारतीय लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कृषितंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय मुळे, कृषि उपसंचालक श्री. दीपक गवळी, कृषि विकास अधिकारी श्री प्रकाश पाटील तसेच कृषितंत्र विद्यालय व राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.